Meta Layoffs 2026 Pudhari
अर्थभान

Meta Layoffs 2026: सकाळी डोळे उघडले आणि नोकरी गेल्याचा मेल आला; मेटाकडून 8 हजार कर्मचाऱ्यांची कपात सुरु

Meta Layoffs 2026: मेटाने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीला सुरुवात करत सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Meta Layoffs 2026: मेटा कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या या कंपनीने 20 मेच्या पहाटेच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचा ईमेल पाठवला. सकाळी उठल्यावर इनबॉक्समध्ये “तुमची नोकरी गेली” असा मेल पाहून अनेक कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेटा आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येतील सुमारे 10 टक्के म्हणजेच जवळपास 8 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात सिंगापूरमधील टीमपासून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पहाटे 4 वाजता नोकरी गेल्याचा मेल आला

रिपोर्ट्सनुसार, सिंगापूरच्या वेळेनुसार पहाटे 4 वाजता कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवण्यात आला. अचानक आलेल्या या मेलमुळे अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला. गेल्या काही आठवड्यांपासून कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर कंपनीने त्यावर शिक्कामोर्तब करत प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली आहे.

AI साठी मोठी गुंतवणूक, टीम स्ट्रक्चरमध्ये बदल

मार्क झुकरबर्ग यांनी आता कंपनीचा सर्वाधिक भर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर केंद्रित केला आहे. Meta ला AI क्षेत्रात OpenAI आणि Google सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करायची आहे. त्यामुळे कंपनी मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करत आहे.

मेटाच्या चीफ पीपल ऑफिसर जेनेला गाले यांनी अंतर्गत मेमोमध्ये सांगितलं की, 8 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यासोबतच सुमारे 7 हजार कर्मचाऱ्यांना नव्या AI टीममध्ये हलवलं जाणार आहे. कंपनी आता छोट्या पण अधिक प्रभावी टीम्स तयार करण्याच्या तयारीत आहे.

AI वर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक

मेटाने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, कंपनी यंदा AI क्षेत्रात तब्बल 125 अब्ज डॉलर ते 145 अब्ज डॉलर इतकी मोठी गुंतवणूक करणार आहे. सध्या मेटामध्ये जगभरात सुमारे 78 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

टेक क्षेत्रात कर्मचारी कपात सुरुच

मेटाच नव्हे, तर इतर मोठ्या टेक कंपन्याही कर्मचारी कपातीच्या मार्गावर आहेत. अलीकडेच Cisco ने 4 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय Microsoft, Amazon आणि इतर कंपन्यांनीही कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. AI मुळे टेक क्षेत्रात मोठे बदल घडत असून, भविष्यात नोकरीचं स्वरूपही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT