Jio Platforms IPO Pudhari
अर्थभान

Jio Platforms IPO: जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO ला तुफान प्रतिसाद! अवघ्या एका तासात पूर्ण सबस्क्राइब; किती कमाई होणार?

Jio Platforms IPO: 25 टक्के प्रीमियम प्रत्यक्ष लिस्टिंगमध्ये दिसल्यास 12 शेअर्सवर अंदाजे ₹3,360 फायदा होऊ शकतो. मात्र, हा केवळ अंदाज आहे.

Rahul Shelke

Jio Platforms IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असलेल्या या इश्यूमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनाही पैसे गुंतवण्याची संधी आहे. आयपीओ सुरू झाल्यानंतर अवघ्या एका तासात तो पूर्ण सबस्क्राइब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (QIB) श्रेणीतही मोठी मागणी दिसून आली.

२३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ आज बुधवारी खुला झाला असून गुंतवणूकदारांना २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंपनी या इश्यूअंतर्गत १० रुपये दर्शनी मूल्याचे २७ कोटी नवीन शेअर्स बाजारात आणले आहेत.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ खुला होण्यापूर्वी सोमवारी अँकर गुंतवणूकदारांसाठी हा इश्यू खुला करण्यात आला होता. त्याला सुमारे ३० पट प्रतिसाद मिळाला आहे.

२८ ऑक्टोबरला शेअर बाजारात लिस्टिंग?

आयपीओ बंद झाल्यानंतर २६ ऑक्टोबरला शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. २७ ऑक्टोबरला परतावा आणि शेअर्स खात्यात जमा करण्याची प्रक्रिया होणार असून, २८ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा प्राइस बँड किती?

मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओचा आकार ३०,२१३ कोटी रुपये आहे. या आयपीओसाठी प्रति शेअर १,०६५ ते १,११९ रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे.

आयपीओमधील आरक्षणाची विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

  • पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB): ५० टक्के

  • बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII): १५ टक्के

  • किरकोळ गुंतवणूकदार: ३५ टक्के

फक्त १३,४२८ रुपयांत किती शेअर्स मिळू शकतात?

या आयपीओचा लॉट साइज १२ शेअर्सचा आहे. वरच्या प्राइस बँडनुसार एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना १३,४२८ रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी अर्ज करताना किमान १३,४२८ रुपयांची तरतूद करावी लागेल. मात्र, अर्ज केला म्हणजे शेअर्सचे वाटप निश्चित होईलच असे नाही. किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करता येईल.

ग्रे मार्केटमध्ये २५ टक्के प्रीमियमचा अंदाज; किती होऊ शकतो फायदा?

आयपीओ खुला होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सचा प्रीमियम सुमारे २५ टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या अंदाजानुसार, शेअरची संभाव्य लिस्टिंग किंमत १,३९२ रुपये सांगण्यात आली होती.

वरच्या प्राइस बँडनुसार १,११९ रुपयांना शेअर मिळाल्यास आणि तो १,३९२ रुपयांवर लिस्ट झाल्यास, प्रति शेअर २७३ रुपयांचा फरक पडू शकतो.

१२ शेअर्सच्या एका लॉटसाठी गणित असे असेल:

  • एका लॉटमधील गुंतवणूक: १३,४२८ रुपये

  • संभाव्य लिस्टिंग मूल्य: १६,७०४ रुपये

  • संभाव्य फरक: ३,२७६ रुपये

हा केवळ ग्रे मार्केट प्रीमियमवर आधारित अंदाज आहे. प्रत्यक्ष लिस्टिंग किंमत कमी किंवा जास्त असू शकते. तसेच, शेअर्सचे वाटप होणे आवश्यक आहे. यात कर आणि इतर लागू शुल्क विचारात घेतलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT