ITR Filing App Pudhari File Photo
अर्थभान

ITR Deadline 2025 | शेवटचे दोन दिवस, २ कोटींहून अधिक रिटर्न बाकी, आयकर वेबसाइटवर ट्रॅफिकचा ताण वाढणार!

ITR Deadline 2025 | आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरपर्यंत ५.४७ कोटी रिटर्न भरले गेले आहेत, त्यापैकी ३.६६ कोटी रिटर्नची पडताळणी देखील पूर्ण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

ITR Deadline 2025

आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. अजूनही लाखो करदाते आपले रिटर्न भरलेले नाहीत तर मोठा त्रास ठरू शकतो. तज्ञांच्या मते, वेबसाइटची डाऊन होणे, महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर न मिळणे आणि ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण न होणे अशा अडचणी करदात्यांना शेवटच्या क्षणी वारंवार भेडसावतात.

2025 मध्ये किती रिटर्न भरले गेले?

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबरपर्यंत ५.४७ कोटी रिटर्न भरले गेले आहेत, त्यापैकी ३.६६ कोटी रिटर्नची पडताळणी देखील पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी एकूण ७.२८ कोटी रिटर्न भरले गेले होते. यंदाही तोच आकडा गाठायचा असेल, तर अजूनही जवळपास २ कोटी लोकांनी आयटीआर भरायचे बाकी आहे. यामुळे शेवटच्या दोन दिवसांत वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक वाढण्याची शक्यता आहे.

शेवटच्या क्षणी वेबसाइट संथ का होते?

कर तज्ञ सांगतात की आयकर विभागाच्या वेबसाइटवर एकाच वेळी लाखो लोक लॉगिन केल्याने सर्व्हरवर प्रचंड दबाव येतो. त्यामुळे वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) आणि करदात्याची माहिती सारांश (TIS) डाउनलोड करण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. या कागदपत्रांमध्ये तुमचे सर्व आर्थिक व्यवहार, भांडवली नफा, व्याजावर मिळालेले उत्पन्न याची माहिती असते. ही माहिती रिटर्न भरताना बरोबर टाकली नाही तर पुढे नोटीस येऊ शकते.

ज्येष्ठ नागरिकांना होतो जास्त त्रास

तज्ञांच्या मते, अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डीमॅट खात्यातील व्यवहार, भांडवली नफा याची पूर्ण कल्पना नसते. ही माहिती AIS/TIS मध्ये मिळते. त्यामुळे शेवटच्या क्षणी हे डॉक्युमेंट्स न मिळाल्यास चुकीची माहिती टाकण्याचा धोका वाढतो.

आयकर विभागाचा इशारा

आयकर विभाग सतत करदात्यांना SMS आणि ईमेलद्वारे स्मरणपत्र पाठवत आहे की, अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गडबड टाळून वेळेत रिटर्न भरावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

रिटर्न भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

तज्ञ सांगतात –

  • योग्य ITR फॉर्म निवडणे आवश्यक आहे.

  • AIS आणि 26AS मधील माहितीशी तुमचा डेटा जुळत आहे याची खात्री करणे.

  • जर काही थकबाकी कर असेल तर तो आधी भरावा.

  • जर शंका असेल तर कर सल्लागाराची मदत घ्यावी.

ई-व्हेरिफिकेशन करायला विसरू नका

रिटर्न भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. जर हे केले नाही, तर तुमचा रिटर्न अवैध ठरतो आणि तुम्हाला पुन्हा प्रक्रिया करावी लागते.

अंतिम तारीख चुकवल्यास काय होईल?

जर तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत रिटर्न भरला नाही, तरी तुम्हाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उशिरा रिटर्न भरता येतो. मात्र यासाठी दंड भरावा लागेल –

  • वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असल्यास दंड ५,००० रुपये.

  • वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असल्यास दंड १,००० रुपये.

म्हणूनच शेवटच्या क्षणी रिटर्न भरणे टाळा. वेळेत रिटर्न भरल्यास वेबसाइटवरील ताण, कागदपत्रांची अडचण आणि चुकीची माहिती भरण्याचा धोका टाळता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT