Invest in ULIP schemes
युलिप योजनांमध्ये गुंतवणूक Pudhari News Network
अर्थभान

युलिप योजनांमध्ये गुंतवणूक करताना...

पुढारी वृत्तसेवा
जगदीश काळे

काही विमा कंपन्या त्यांच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांची जोरदार जाहिरात करत आहेत. काही वितरक आणि एजंट म्युच्युअल फंडांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत युलिप विकत आहेत, असे समोर आले आहे. अशा परिस्थितीत ऑफर विमा कंपनीची आहे की फंड हाऊसची आहे, हे समजून न घेता बरेच ग्राहक ते खरेदी करतात. युलिपमधील विमा संरक्षणासाठी मोर्टेलिटी चार्जेस भरावे लागतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे शुल्क जास्त भरावे लागते. युलिपला पाच वर्षांचा लॉक-इन असल्याने ते गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरू शकते.

युलिपमध्ये प्रीमियम दरवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंत असल्यास, मॅच्युरिटी रक्कम करमुक्त होते. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% कर आकारला जातो. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी बचत करत असाल आणि तो कॉलेजला गेल्यावर ठरावीक रक्कम ठेवू इच्छित असाल, तर तुमच्या अनुपस्थितीतही ती रक्कम कुटुंबाला मिळेल याची सोय युलिपद्वारे करू शकता. तथापि, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात पहिल्या 5 वर्षांत रक्कम काढू शकत नाही, याचा अडसरही निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे युलिपमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी तपासणे महत्त्वाचे आहे. ज्या ग्राहकांना 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी युलिप ही एक उत्तम पॉलिसी आहे. युलिपचे दोन प्रकार आहेत : टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 मध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला गुंतवणूक मूल्य किंवा विम्याची रक्कम, यापैकी जी जास्त असेल ती मिळते. टाईप 2 मध्ये, नॉमिनीला विम्याची रक्कम आणि गुंतवणूक मूल्य दोन्ही मिळते. चांगल्या परताव्यासाठी युलिपमध्ये गुंतवणूक करत असाल, तर टाईप 1 युलिप निवडावी आणि विमा संरक्षणासाठी गुंतवणूक करत असाल, तर टाईप 2 अधिक लाभदायक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वी विमा कंपनीच्या विविध फंडांची मागील कामगिरी तपासणेदेखील महत्त्वाचे आहे. जर गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता हवी असेल (तरलता, कव्हर कमी करण्याचा पर्याय) तर टर्म प्लॅन आणि म्युच्युअल फंड यांचे एकत्रित धोरण त्यांच्यासाठी अधिक चांगले असेल.

SCROLL FOR NEXT