[author title="प्रसाद पाटील" image="http://"][/author]
वित्तीय नियोजनामध्ये केवळ गुंतवणुकीवर मिळणारा परतावा डोळ्यासमोर ठेवून चालत नाही; तर मिळणार्या परताव्यावरील कर, गुंतवणुकीची गरज, योजना यांचा साकल्याने विचार करावा लागतो. यामध्ये काही गोष्टी कटाक्षाने टाळावयाच्या असतात.
सामान्यतः गुंतवणूकदारांकडून कोणकोणत्या चुका होऊ शकतात, हे या लेखात आपण पाहूया.
अनेक वेळा करबचतीसाठी गुंतवणूक करताना लोक योग्य योजना निवडत नाहीत. दीर्घकाळात मोठे फायदे मिळवायचे असतील, तर पीपीएफ हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असू शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या निवृत्तीची योजना करू शकता. या सर्व योजनांची निवड करताना तुमच्या गरजा लक्षात ठेवा.
जर तुम्ही कर बचतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक टाळावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्हाला आयकर कलम 24 अंतर्गत त्याच्या ईएमआयच्या व्याज भागावर कर सवलतीचा लाभ मिळेल. आयकराच्या कलम 80 सी अंतर्गत मूळ रकमेवर सूट मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पीपीएफमध्ये फक्तकर सूट मिळवण्यासाठी गुंतवणूक करत असाल, तर ती गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक ठरेल. कारण आयकराच्या कलम 80 सी अंतर्गत कमाल सूट मर्यादा फक्त 1.50 लाख रुपये आहे.
करबचतीसाठी गुंतवणूक करताना अनेक वेळा करदाते त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणत नाहीत. पण, यामुळे कालांतराने त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही पीपीएफसारख्या योजनांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. पण, त्याच वेळी चांगल्या परताव्यासाठी ईएलएसएस फंडासारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. कोणत्याही योजनेचे भविष्यातील परतावे आणि फायदे यांची योग्य तपासणी केल्यानंतरच गुंतवणुकीचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा.
जुन्या कर प्रणालीनुसार, आयकराच्या कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या सवलतीशिवाय, करदात्यांना इतर अनेक कर कपातींचा लाभ देखील मिळतो. यामध्ये, एनपीएसमध्ये गुंतवणुकीवर कलम 80सीसीडी(1बी) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. याशिवाय गृहकर्जावरील व्याजदर आणि वैद्यकीय विमा घेणे इत्यादींवरही करमाफीचा लाभ मिळतो. अशा परिस्थितीत करबचतीसाठी गुंतवणूक करताना या सर्व कपातीचा समावेश करायला विसरू नका.