Stock Market Today: आठवड्याच्या एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात सकारात्मक वातावरणात व्यवहाराला सुरुवात झाली. चांगले तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढल्याने बाजाराला सुरुवातीपासूनच आधार मिळाला. सेन्सेक्स सुमारे 250 ते 300 अंकांनी वाढून व्यवहार करताना दिसला, तर निफ्टीमध्ये सुमारे 60 अंकांची वाढ झाली. बँकिंग शेअर्समध्ये खरेदीचा जोर राहिल्याने बँक निफ्टीही सुमारे 260 अंकांनी वधारला.
देशांतर्गत बाजारासाठी आज सकाळी जागतिक बाजारांकडूनही चांगले संकेत मिळाले. अमेरिकन शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. डाओ जोन्स तब्बल 580 अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर पोहचला . एस अँड पी 500 आणि रसेल 2,000 यांनीही नवे ऑल टाइम हाय गाठले, तर नॅस्डॅक सुमारे 60 अंकांनी वाढला.
मात्र, अमेरिकेतील डिसेंबर महिन्याच्या महागाईच्या आकडेवारीआधी डाओ फ्युचर्समध्ये थोडी घसरण दिसून आली. गिफ्ट निफ्टी सकाळी सुमारे 50 अंकांच्या वाढीसह 25,900च्या आसपास व्यवहार करत होता. आशियाई बाजारांत जपानचा निक्केई निर्देशांक निवडणुकांच्या चर्चेमुळे मोठ्या तेजीसह वाढला आणि जवळपास 1,700 अंकांनी वाढला.
संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या हालचाली पाहिल्या तर परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच आहे. काल एफआयआयने सुमारे 3,975 कोटी रुपयांची नेट विक्री केली असून सलग सहाव्या दिवशी त्यांनी बाजारातून पैसा काढला आहे. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा बाजारावर विश्वास कायम आहे. देशांतर्गत फंडांनी सलग 95व्या दिवशी खरेदी करत सुमारे 5.839 कोटी रुपये बाजारात गुंतवले.
आज बाजाराचे लक्ष भारत-अमेरिका व्यापार कराराशी संबंधित संभाव्य चर्चेकडे आहे. याबाबत अधिकृत घोषणा नसली तरी नव्या अमेरिकन राजदूतांनी चर्चेला गती मिळण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्याने जागतिक बाजारात अस्थिरतेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महागाईच्या आघाडीवर थोडा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून सीपीआय 1.33 टक्क्यांवर आहे. अन्नधान्य महागाईत वाढ झाली असली तरी ती अद्याप निगेटिव्ह झोनमध्ये आहे.
कॉर्पोरेट निकालांच्या बाबतीत एचसीएल टेकने मजबूत महसूल वाढीसह चांगले निकाल जाहीर केले आहेत. टीसीएसचे निकाल अंदाजे अपेक्षेनुसार असले तरी कंपनीचा पुढील काळाचा अंदाज सकारात्मक आहे. आज आयसीआयसीआय लॉम्बार्ड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ आणि टाटा एल्क्सी यांच्या तिमाही निकालांकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे.