Luxury Perfume Market Pudhari
अर्थभान

Luxury Perfume Market: डिओडरंटला रामराम! भारतीय पुरुषांची लक्झरी परफ्युमला पसंती; ब्युटी इंडस्ट्रीत 15 टक्के वाढ

Luxury Perfume Market India: भारतामध्ये लक्झरी परफ्युमच्या बाजारात पुरुषांचा वाटा वाढताना दिसत आहे. महागड्या परफ्युम विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. बाजारात पुरुषांचा वाटा तब्बल 60 टक्के आहे.

Rahul Shelke

Luxury Perfume Market India: पूर्वी परफ्युम फक्त महिला वापरायच्या असं मानलं जायचं. पण आता चित्र झपाट्याने बदलत आहे. भारतात सुगंधी द्रव्यांचा म्हणजेच परफ्युम आणि डिओडरंटचे मार्केट वेगाने वाढत असून या वाढीमागे सर्वात मोठा वाटा पुरुषांचा आहे.

सध्या भारतातील एकूण परफ्युम मार्केटमध्ये पुरुषांचा वाटा तब्बल 60 टक्के आहे. 2024 मध्ये पुरुषांच्या सुगंधी उत्पादनांची विक्री सुमारे 14.6 टक्क्यांनी वाढली, जी संपूर्ण बाजाराच्या वाढीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा की, पुरुष आता केवळ परफ्युम वापरत नाहीत, तर अधिक महाग आणि दर्जेदार ब्रँडकडे वळत आहेत.

पूर्वी बहुतेक पुरुष स्वस्त डिओडरंटवरच समाधान मानायचे. पण आता वाढलेले उत्पन्न, बदलती जीवनशैली यामुळे परफ्युम रोजच्या वापराचा भाग बनत आहे. एखाद्या खास प्रसंगापुरता मर्यादित असलेला परफ्युम आता ऑफिस, पार्टी, प्रवास... सगळीकडे वापरला जातो.

या बदलाचा थेट परिणाम विक्रीवर दिसत आहे. मोठ्या ऑनलाइन ब्यूटी प्लॅटफॉर्मवर पुरुषांकडून होणारी खरेदी वेगाने वाढत आहे. एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लक्झरी परफ्युम विक्रीपैकी जवळपास निम्मी विक्री पुरुषांकडून होते. विशेष म्हणजे महागड्या परफ्युमची सरासरी खरेदी सामान्य सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेत तब्बल तीनपट आहे.

भारतातील काही देशांतर्गत ब्रँड्सनाही याचा मोठा फायदा होत आहे. पुरुषांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांची उलाढाल शेकडो कोटींमध्ये होत आहे. काही ब्रँड्सने तर लक्झरी व्हर्जनही बाजारात आणली आहेत. स्वस्त डिओडरंटपासून सुरुवात करणारे ग्राहक हळूहळू महागड्या परफ्युमकडे वळत आहेत.

दरम्यान, परदेशी लक्झरी ब्रँड्सही भारतात पुरुषांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन परफ्युम लॉन्च करत आहेत. आज ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे परफ्युम सहज मिळतात. काही खास लक्झरी ब्रँड्सचे एका बाटलीचे दर 30 हजार रुपयांहून अधिक आहेत.

या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिराती. पूर्वी स्वस्त ब्रँडसाठी कलाकार जाहिराती करायचे. आता मात्र महागड्या परफ्युम ब्रँडसाठीही मोठे कलाकार जाहिराती करत आहेत. यामुळे लक्झरी परफ्युमचा ट्रेंड आणखी वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतातील मध्यमवर्ग झपाट्याने वाढत असून लोक आता स्वतःवर खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. चांगला सुगंध ही आता स्टेटस आणि पर्सनॅलिटीचा भाग बनत आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत परफ्युम बाजार दरवर्षी सुमारे 15 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT