India GDP Growth FY26
नवी दिल्ली : जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि इंधनाच्या वाढत्या किमती यांसारख्या आव्हानांना न जुमानता भारताच्या अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) मध्ये वेग घेतला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, वास्तविक जीडीपी (स्थूल अंतर्गत उत्पादन) ७.७% नोंदवला गेला आहे, जो मागील आर्थिक वर्षात ७.१% होता.
सरकारच्या प्राथमिक अंदाजांनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला आहे. जानेवारी-मार्च तिमाहीतील मजबूत कामगिरीमुळे स्थूल अंतर्गत उत्पादन (GDP) दर ७.७% वर पोहोचला आहे.
'केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने' आज (दि. ५ जून) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ७.८% दराने झेप घेतली आहे. यामुळे आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशाच्या विकासाचा वेग मजबूत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२२-२३ च्या स्थिर किमतींवर आधारित 'वास्तविक जीडीपी' (Real GDP) आर्थिक वर्ष २६ मध्ये ३२३.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे, जो आर्थिक वर्ष २५ मध्ये २९९.८९ लाख कोटी रुपये होता. तर महागाईचा प्रभाव समाविष्ट असलेला 'नॉमिश्नल जीडीपी' (Nominal GDP) ८.९% ने वाढून ३४६.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी ३१८.०७ लाख कोटी रुपये होता.
ताजी आकडेवारी दर्शवते की, संपूर्ण आर्थिक वर्ष २६ मध्ये देशातील आर्थिक घडामोडी मजबूत होत्या. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत स्थूल अंतर्गत उत्पादन (GDP) आणि ''स्थूल मूल्यवर्धन'' (GVA) या दोन्हीमध्ये सुधारणा झाली आहे.
कर आणि सबसिडी वगळून आर्थिक उत्पादनाचे मोजमाप करणारा 'वास्तविक जीव्हीए' (Real GVA) आर्थिक वर्ष २६ मध्ये ७.९% राहिला, तो आर्थिक वर्ष २५ मध्ये ७.३% होता. चालू किमतींवर आधारित 'नॉमिश्नल जीव्हीए' ९.१% ने वाढून ३१४.८७ लाख कोटी रुपये झाला आहे, जो आधीच्या वर्षी २८८.५४ लाख कोटी रुपये होता. या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. आर्थिक घडामोडींमध्ये सेवा क्षेत्राचा (Services Sector) वाटा नेहमीप्रमाणे सर्वात मोठा राहिला, तर मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन), बांधकाम आणि इतर औद्योगिक क्षेत्रांनीही या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
सरकारच्या मते, औद्योगिक उत्पादन, जीएसटी संकलन, कंपन्यांचे आर्थिक निकाल, वाहन विक्री, मालवाहतूक, टेलिकॉमचा वापर, बँकिंग व्यवहार, कर संकलन आणि व्यापार आकडेवारी यांसारख्या अनेक घटकांचा विचार करून हे अंदाज तयार करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २६ च्या शेवटच्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेने आपली मजबूत गती कायम ठेवली. जानेवारी-मार्च या कालावधीत 'वास्तविक जीडीपी' ८७.७७ लाख कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या याच काळात ८१.४० लाख कोटी रुपये होता. म्हणजेच यात ७.८% ची वाढ झाली आहे.
या तिमाहीत 'नॉमिश्नल जीडीपी' ९.१% ने वाढून ९४.६५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. तसेच मार्च तिमाहीत 'वास्तविक जीव्हीए' ७.९% ने, तर 'नॉमिश्नल जीव्हीए' ९.९% ने वाढला. हे आकडे दर्शवतात की जागतिक पातळीवरील आव्हानांनंतरही देशांतर्गत मागणी मजबूत राहिली, ज्यामुळे आर्थिक विकासाला हातभार लागला.
मंत्रालयाने म्हटलं आहे की, या अंदाजामध्ये चौथ्या तिमाहीची अद्ययावत माहिती आणि आधीच्या तिमाहींच्या सुधारित आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आगामी काळातील जीडीपीचे आकडे हे २०२२-२३ या पायाभूत वर्षावर आधारित सुधारित 'औद्योगिक उत्पादन निर्देशांक' (IIP) आणि 'घाऊक किंमत निर्देशांक' (WPI) नुसार जाहीर केले जातील. आता पुढील आर्थिक वर्ष २७ च्या पहिल्या (एप्रिल-जून) तिमाहीचे जीडीपी आकडे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केले जातील.