SIP investment plan
मुंबई : "उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, मग गुंतवणूक कशी करू?" असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, आर्थिक नियोजनाच्या भाषेत 'जेव्हा जाग आली तीच सकाळ' असे म्हटले जाते. जर तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक सुरू केली, तर पगार कमी असतानाही तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच एक पाऊल उचलून तुम्ही तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजा सुरक्षित करू शकता.
म्युच्युअल फंडमधील SIP हा सध्या गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित मानला जाणारा मार्ग आहे. यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असण्याची गरज नाही. महत्त्वाचे आहे ते गुंतवणुकीतील सातत्य. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितका फायदा तुम्हाला जास्त मिळेल.
गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. SIP कॅलक्युलेटरनुसार १० वर्षात करोडपती बनण्यासाठी प्रति महिना ३६ हजार रूपयांची SIP करणे गरजेचे आहे.
मासिक SIP: ३६,००० रुपये
अपेक्षित परतावा: १५%
एकूण गुंतवणूक: ४३,२०,००० रुपये
अंतिम फंड: १,००,३१,६६२ रुपये
एकूण नफा: ५७,११,६६२ रुपये
परंतू मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तीसाठी दरमहा ₹३६,००० गुंतवणूक करणे कठीण आहे.
१५ वर्षांत करोडपती होण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान १५,००० रूपये गुंतवणूक करावी लागेल, ज्याचा १५% परतावा मिळायला हवा. जर तुम्ही १२% परतावा मोजला तर तुम्हाला दरमहा २०,००० गुंतवणूक करावी लागेल. १५ वर्षांनंतर तुम्हाला ६४.९१ लाखांचा नफा होईल, तर या संपूर्ण कालावधीत तुमची गुंतवणूक फक्त ३६ लाख असेल.
जर तुम्ही २० वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये दरमहा ६,६०० गुंतवले तर तुम्हाला १५% परताव्यासह अंदाजे १ कोटी मिळतील. या २० वर्षांमध्ये, तुम्हाला एकूण १५,८४,००० गुंतवावे लागतील, ज्यातून ८४,२१,३०३ रूपये परतावा मिळेल. जर १२% परतावा मिळत असेल तर तुम्हाला दरमहा किमान ९,००० गुंतवणूक करावी लागेल.
मासिक SIP: ६,६०० रुपये (२० वर्षे)
वार्षिक परतावा: १५%
एकूण फंड: १,००,०५,३०३ रुपये
एकूण गुंतवणूक: १५,८४,००० रुपये
मिळालेला नफा: ८४,२१,३०३ रुपये
केवळ १,५०० रुपयांच्या मासिक SIP द्वारे तुम्ही ३० वर्षांनंतर करोडपती होऊ शकता. ३० वर्षांनंतर तुमचा फंड १,०५,१४,७३१ रुपये होईल (१५% परताव्याच्या दराने). तसेच, जर एखाद्या २० वर्षीय तरुणाने सलग ४० वर्षे केवळ ९०० रुपये गुंतवले, तर १२.५% सरासरी परताव्याच्या दराने त्याला एकूण १,०१,५५,१६० रुपये मिळतील.
म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य फंड निवडणे सर्वात महत्त्वाचे असते. लहान गुंतवणूकदारांसाठी फंड निवडणे हे कठीण काम असू शकते, कारण त्यासाठी संशोधनाची गरज असते. म्हणूनच, गुंतवणुकीपूर्वी सर्व बाजूंचा विचार करा आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारपेठेतील जोखमीच्या अधीन असते.