FASTag Reward Scheme: हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि थोडी वेगळी बातमी आहे. आपण सगळेच कधी ना कधी टोल प्लाझावर थांबतो. पण तिथे असलेले टॉयलेट्स पाहून अनेकदा नाक मुरडावं लागतं. घाण, दुर्गंधी आणि खराब सुविधा, ही समस्या नवीन नाही. पण आता सरकारने यावर एक भन्नाट उपाय शोधला आहे. आणि विशेष म्हणजे, या कामात तुम्हालाच सहभागी करून घेतलं आहे. त्यासाठी तुम्हाला थेट 1,000 रुपयांचं बक्षीसही मिळू शकतं.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हायवेवरील सुविधा सुधारण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या योजनेत, जर तुम्हाला कोणत्याही टोल प्लाझावर घाणेरडं टॉयलेट दिसलं, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. आणि तुमची तक्रार खरी असेल, तर तुम्हाला थेट 1,000 रुपये FASTag मध्ये मिळणार आहेत. होय, अगदी खरं आहे. हे पैसे कॅशमध्ये नाही, तर तुमच्या FASTag खात्यात रिचार्ज म्हणून जमा होतील. म्हणजे पुढच्या प्रवासात टोल भरताना तुम्हाला त्याचा थेट फायदा होईल.
या सगळ्या प्रक्रियेसाठी सरकारने राजमार्ग यात्रा (Rajmargyatra) नावाचं अॅप वापरायला सांगितलं आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत तक्रार नोंदवू शकता. सरकारचा उद्देश आहे की, हायवेवरील टॉयलेट्स स्वच्छ ठेवणं आणि टोल ऑपरेटरना जबाबदारी घ्यायला लावणं.
प्रक्रिया खूप सोपी आहे, कुणालाही सहज करता येईल.
सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये राजमार्ग यात्रा (Rajmargyatra) अॅप डाउनलोड करा.
तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा.
यानंतर अॅपमध्ये जाऊन फीडबॅक किंवा इश्यू रिपोर्टिंगचा पर्याय निवडा.
तुम्हाला ज्या टोल प्लाझावर घाणेरडं टॉयलेट दिसलं आहे, त्याचा एक स्पष्ट फोटो काढा.
यानंतर त्या टोल प्लाझाचं नाव, लोकेशन आणि इतर आवश्यक माहिती भरा.
सगळं भरून झाल्यावर रिपोर्ट सबमिट करा.
आता पुढचं काम सरकारचं.
तुमची तक्रार संबंधित अधिकारी तपासतील.
जर ती योग्य आढळली, तर तुमच्या FASTag खात्यात 1000 रुपये जमा केले जातील.
ही योजना फक्त बक्षीस देण्यासाठी नाही, तर एक मोठा बदल घडवण्यासाठी आहे. आतापर्यंत लोक फक्त तक्रार करत होते, पण आता त्यांना थेट सहभागी करून घेतलं जात आहे. यामुळे टोल प्लाझावरील स्वच्छता सुधारेल, टोल कंपन्यांवर दबाव वाढेल, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक स्वतः पुढे येऊन बदल घडवतील.
हायवेवर प्रवास करताना जर तुम्हाला घाणेरडं टॉयलेट दिसलं, तर आता फक्त तक्रार करून थांबू नका. त्याचा फोटो काढा, अॅपवर अपलोड करा आणि 1000 रुपयांचं बक्षीस मिळवा. कारण आता स्वच्छतेची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर प्रत्येक प्रवाशाची आहे.