Cigarette Tax Impact ITC Stock: सिगरेटवर नव्या कराची घोषणा होताच शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सरकारने सिगरेटवर अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी सिगरेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. याचा सर्वात मोठा फटका देशातील आघाडीची सिगरेट उत्पादक कंपनी आयटीसीला बसला असून अवघ्या एका दिवसात कंपनीचे बाजारमूल्य तब्बल 50 हजार कोटी रुपयांहून अधिक कमी झाले.
वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, 1 फेब्रुवारीपासून सिगरेटच्या लांबीवर आधारित प्रति 1,000 सिगरेट्सवर 2,050 ते 8,500 रुपये इतके उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. हा कर सध्या लागू असलेल्या 40 टक्के GST व्यतिरिक्त असेल. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या तात्पुरत्या करपद्धतीऐवजी आता कायमस्वरूपी उत्पादन शुल्क प्रणाली लागू करण्यात येत आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. गुरुवारी दुपारी आयटीसीचा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी घसरून 362 रुपयांपर्यंत आला. बुधवारी बाजार बंद होताना आयटीसीचे बाजारमूल्य सुमारे 5.05 लाख कोटी रुपये होते, ते गुरुवारी घटून 4.54 लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच कंपनीला एका दिवसात सुमारे 50,491 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
मार्लबोरो सिगरेटची वितरक कंपनी गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. कंपनीचा शेअर 19 टक्क्यांपर्यंत कोसळला.
विश्लेषकांच्या मते, नव्या उत्पादन शुल्कामुळे सिगरेट बनवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेषतः 75 ते 85 मिमी लांबीच्या सिगरेट्सची एकूण किंमत 22 ते 28 टक्क्यांनी वाढू शकते. आयटीसीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 16 टक्के सिगरेट या श्रेणीत येतात, त्यामुळे नफ्यावर थेट परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.
सरकारकडून थेट दरवाढीची घोषणा नसली, तरी वाढलेल्या करांचा भार ग्राहकांवर टाकण्यासाठी कंपन्या सिगरेटचे दर वाढवू शकतात, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या भारतात सिगरेटवर एकूण करभार सुमारे 53 टक्के आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या 75 टक्क्यांच्या निकषांपेक्षा कमी आहे.
सरकारचा दावा आहे की, तंबाखूजन्य पदार्थांसाठी नवी कररचना आणल्याने महसूल वाढेल आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर आळा घालणे हाही या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
सरकारने सिगरेटवर मोठा कर लावल्यामुळे आयटीसी आणि गॉडफ्रे फिलिप्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली आहे. अशा वेळी घाबरून निर्णय घेऊ नका. आयटीसीसारख्या कंपन्यांचा व्यवसाय फक्त सिगरेटवर अवलंबून नाही. FMCG, हॉटेल्स, पेपर आणि कृषी व्यवसायातूनही कंपनीला मोठं उत्पन्न मिळतं.
जर तुम्ही लाँग टर्म गुंतवणूकदार असाल आणि शेअर 5–10 वर्षांसाठी घेतला असेल, तर सध्या घाईघाईने विक्री करू नका. अशा धक्क्यांनंतर बाजार हळूहळू स्थिर होतो.
जर तुम्ही शॉर्ट टर्म किंवा ट्रेडिंगसाठी शेअर घेतला असेल, तर पुढील काही दिवस अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. अशावेळी स्टॉपलॉस लावणं गरजेचं आहे.
सध्या लगेच खरेदी करण्याऐवजी थोडं थांबणं चांगलं. शेअरला स्थिरता येईपर्यंत वाट पाहा. घसरण थांबली आणि सपोर्ट लेव्हल तयार झाला, तर हळूहळू गुंतवणूक करता येईल.
एकाच सेक्टरवर किंवा एका शेअरवर जास्त अवलंबून राहू नका. FMCG, बँकिंग, IT, इन्फ्रास्ट्रक्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक विभागलेली असेल तर धोका कमी होतो.