Government Pension Insurance Schemes Pudhari
अर्थभान

Government Scheme: 5,000 रुपयांची पेन्शन, लाखो रुपयांचा विमा... आणि खर्च फक्त 500 रुपये, ही सरकारी योजना माहितेय का?

Government Pension Insurance Schemes: केंद्र सरकारकडून कमी खर्चात विमा, आरोग्य संरक्षण आणि पेन्शन देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जात आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Government Pension Insurance Schemes: भारत सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. विशेषतः गरीब, असंघटित क्षेत्रातील कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

अनेकांना वाटतं की विमा किंवा पेन्शन योजना म्हणजे मोठा खर्च, पण प्रत्यक्षात काही सरकारी योजनांमध्ये वर्षाला फक्त काहीशे रुपये भरून लाखोंचा फायदा मिळू शकतो. आरोग्य विमा, अपघात विमा, जीवन विमा आणि निवृत्तीनंतरची पेन्शन अशा अनेक सुविधा या योजनांमधून दिल्या जात आहेत.

यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो. सरकारी आणि लिस्टेड खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा या योजनेत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आता ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील खर्चाचा मोठा भार कमी होऊ शकतो.

त्याचबरोबर ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ ही कमी खर्चातील जीवन विमा योजना आहे. या योजनेत वर्षाला फक्त ४३६ रुपये प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच दिवसाला साधारण एक रुपयापेक्षाही कमी खर्चात २ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण मिळते. १८ ते ५० वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे.

‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ ही अपघात विमा योजना देखील अत्यंत स्वस्त मानली जाते. या योजनेत वर्षाला केवळ २० रुपये प्रीमियम भरून अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्वासाठी २ लाख रुपयांचे संरक्षण मिळते. तर अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे कव्हर दिले जाते. १८ ते ७० वयोगटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. कमी खर्चात मोठे संरक्षण मिळत असल्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशीर मानली जाते.

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने ‘अटल पेन्शन योजना’ सुरू केली आहे. ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी झाल्यानंतर वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत हमी पेन्शन मिळू शकते. यात भरायची रक्कम व्यक्तीचे वय आणि निवडलेल्या पेन्शन रकमेवर अवलंबून असते. १८ ते ४० वयोगटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ ही देखील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वाची योजना आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत निवृत्तीनंतर दरमहा ३ हजार रुपयांची पेन्शन मिळते. यामध्ये लाभार्थी जितके योगदान देतो, तितकेच योगदान सरकारकडूनही दिले जाते. मासिक हप्ता ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत असू शकतो.

आजच्या वाढत्या महागाईच्या काळात आरोग्य खर्च, अपघात किंवा निवृत्तीनंतरचे आर्थिक संकट टाळण्यासाठी अशा योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. कमी खर्चात मोठे आर्थिक संरक्षण मिळत असल्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारकडूनही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT