Gold Silver Rate Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळत आहे. १३ मे रोजी सोने तब्बल ९,२३१ रुपयांनी महागले, तर चांदीच्या दरात तब्बल १६,६७५ रुपयांची वाढ झाली आहे. सरकारच्या निर्णयाचा थेट परिणाम बाजारात दिसून येत आहे.
केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील इम्पोर्ट टॅरिफ ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामध्ये १० टक्के बेसिक कस्टम ड्युटी आणि ५ टक्के कृषी उपकराचा समावेश आहे. सरकारचा उद्देश सोने-चांदीची आयात कमी करणे, चालू खात्याच्या तुटीवरील (CAD) दबाव कमी करणे आणि रुपयाला आधार देणे, असल्याचे मानले जात आहे.
या निर्णयानंतर MCX वर चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीचा दर प्रति किलो जवळपास २,९५,८०५ रुपयांपर्यंत पोहोचला, तर काही करारांमध्ये तो २,९९,२८३ रुपयांपर्यंत गेला. अनेक मोठ्या शहरांमध्ये चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. चेन्नईमध्ये चांदीचा भाव थेट ३ लाख रुपयांच्या वर गेला असून, दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यासारख्या शहरांमध्येही चांदी जवळपास २.९० लाख रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे.
MCX वर सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १,६२,६४८ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारातही मोठी वाढ दिसून येत आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्राम १६,८०४ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १४,३३१ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोनं प्रतिग्राम १६,७८९ रुपये आणि २२ कॅरेट सोनं १५,३९० रुपयांवर पोहोचले आहे.
सरकारने अचानक आयात शुल्क का वाढवले, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे भारताची वाढती आयात आणि त्यातून वाढणारा डॉलरचा खर्च. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास सर्व सोने आणि चांदी परदेशातून आयात करतो. त्यासाठी डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारने अनावश्यक आयातींवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सोन्याची आयात तब्बल २४ टक्क्यांनी वाढून ७१.९८ अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. परिणामी देशाचा व्यापार तुटीचा आकडा ३३३.२ अब्ज डॉलरवर गेला, तर चालू खाते तूट GDP च्या १.३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क वाढवल्यामुळे अल्पावधीत सोने आणि चांदी महाग होऊ शकतात. त्यामुळे लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना आता अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र दीर्घकालीन पातळीवर सरकारला आयात कमी करून आर्थिक संतुलन राखण्यात याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.