Gold Price Fall India War Impact: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात अनपेक्षित चित्र पाहायला मिळत आहे. साधारणपणे युद्धाच्या काळात सोने महाग होते, पण यावेळी उलटं घडत आहे. भारतात अवघ्या काही आठवड्यांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 12,000 रुपयांची घसरण झाली असून दर 1.59 लाखांवरून सुमारे 1.47 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.
27 फेब्रुवारी 2026 रोजी युद्ध सुरू होण्याच्या आधी सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर होता. मात्र, 21 मार्चपर्यंत म्हणजेच युद्धाच्या 22 दिवसांत जवळपास 8 टक्क्यांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा दर सुमारे 14 टक्क्यांनी कमी होऊन 4,488 डॉलर प्रति औंसवर आला आहे. हा ट्रेंड पारंपरिक पद्धतीच्या विरुद्ध आहे.
सामान्यतः युद्ध किंवा जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे किंमती वाढतात. 1990 चे गल्फ वॉर, 2003 चे इराक युद्ध किंवा 2022 मधील रशिया-युक्रेन संघर्ष... या युद्धांदरम्यान सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली होती. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या घसरणीमागे चार प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे मजबूत डॉलर. डॉलर मजबूत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोने महाग होते आणि त्याची मागणी कमी होते. सध्या गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर डॉलरकडे वळले आहेत.
दुसरे कारण म्हणजे व्याजदर आणि महागाईचा संबंध. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईची भीती वाढली असली, तरी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवले नाहीत. त्यामुळे डॉलर अधिक मजबूत झाला आणि सोन्याचे आकर्षण कमी झाले.
तिसरे कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. 2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा काढण्यासाठी विक्री सुरू केली, ज्यामुळे बाजारात पुरवठा वाढला आणि दर खाली आले.
चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात कमी झालेली मागणी. वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. मुंबईसारख्या मोठ्या बाजारात ज्वेलरी विक्रीत 75 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्वेलर्सकडे आधीच स्टॉक असल्याने त्यांनी नवीन खरेदीही कमी केली आहे.
आता पुढे सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातील, याबाबत मतभेद आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, 2026 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 6,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. जर रुपया कमकुवत राहिला, तर भारतात सोन्याचा दर 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंतही पोहोचू शकतो. मात्र हे सर्व इराण-इस्रायल संघर्ष, कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या स्थितीवर अवलंबून असेल.
दरम्यान, चांदीच्या बाजारातही मोठे चढ-उतार दिसून आले आहेत. 2025 मध्ये 86,000 रुपये प्रति किलो असलेली चांदी 2026 मध्ये 3.39 लाखांपर्यंत पोहोचली होती, मात्र आता ती सुमारे 2.32 लाखांवर आली आहे. तरीही औद्योगिक मागणी मजबूत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांदीत संधी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
एकूणच, सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात अनिश्चितता आणि चढ-उतार कायम आहेत. गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे. दीर्घकालीन दृष्टीने मात्र दोन्ही धातूंमध्ये अजूनही चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.