Gold prices Akshaya Tritiya 2025
मुंबई : अक्षयतृतीया शुभमुहूर्ताच्या आधी सोने दरात मोठा बदल झाला आहे. एक लाख पार झालेले सोने आता खाली उतरू लागले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मंगळवारी सोन्याचा दर ४ हजार रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम ९५,३०० रुपयांवर खुला झाला.
गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,३५८ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. तर चांदीच्या दरात किचिंत घसरण झाली. चांदीचा दर आज प्रति किलो ९६,२५५ रुपयांवर खुला झाला. त्यात केवळ २०९ रुपयांची घसरण दिसून आली.
अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya 2025) एक शुभमुहूर्त मानला जातो. ३० मे रोजी अक्षयतृतीया असून या मुहूर्तावर सोन्याची (Gold Price Today) खरेदी केली जाते.
२२ एप्रिल रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाखांवर गेला होता. हा सोने दराचा उच्चांक होता. दरम्यान, गेल्या काही दिवसात सोन्याचा दर १ लाख रुपयांवरून सुमारे ९५ हजार रुपयांपर्यंत खाली आला. गेल्या वर्षी अक्षयतृतीयेदिवशी सोन्याचा दर ७२ हजारांवर होता.
हे वर्ष सोन्यासाठी महत्त्वाचे ठरले. कारण जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस ३,५०० डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांनंतर अमेरिका-चीन यांच्यात व्यापार संघर्ष तीव्र झाला होता. यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) म्हणून मागणीही वाढली. परिणामी सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी अमेरिका आणि त्याच्या भागीदारी देशांमधील व्यापार तणाव कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली. आज स्पॉट गोल्डचा दर ०.८ टक्के कमी होऊन प्रति औंस ३,३१४ डॉलरवर आला.
"अलीकडे जोखीमेच्या परिस्थितीत स्पष्टपणे सुधारणा झाली आहे. तसेच व्यापार तणाव निवळण्याची शक्यता आहे. या आशावादाने बाजारातील गुंतवणूदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे," असे आयजी मार्केट स्ट्रॅटेजिस्ट येप जून रोंग यांनी म्हटले आहे.