

एनपीएस ही लवचिक योजना आहे. आपत्कालीन स्थितीत गरज पडल्यास तुम्ही जमा केलेले पेसै काढू शकता. जर एखाद्या सदस्याने त्याच्या खात्यात निर्धारित किमान रक्कम जमा केली नाही, तर त्याचे एनपीएस खाते गोठवले जाऊ शकते. तुमचे एनपीएस खाते गोठवले असल्यास ते पुन्हा सक्रिय करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक चणचण भासू नये म्हणून एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना एक आकर्षक पर्याय म्हणून पुढे आली आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळते. अन्य योजनांच्या तुलनेत या योजनेत पैसे गुंतवताना कमी फी आकारली जाते. म्युच्युअल फंडशी तुलना करायची झाल्यास या योजनेत वर्षाला 2 ते 2.5 टक्के फी द्यावी लागते. एनपीएसमध्ये मात्र यापेक्षा कमी फी आकारली जाते. एनपीएस योजनेत कराचीही बचत होते. एनपीएस योजनेत गुंतवलेल्या पैशांवर मिळणारे व्याज आणि म्यॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम यावर कर आकारला जात नाही. तसेच यातील गुंतवणुकीवर सेक्शन 80 सी अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. एनपीएस योजनेमुळे जवळपास एकूण 2 लाख रुपयांचा करबचतीचा फायदा घेता येतो. एनपीएस ही लवचिक योजना आहे. आपत्कालीन स्थितीत गरज पडल्यास तुम्ही जमा केलेले पेैसे काढू शकता. मात्र, त्यासाठी तुम्ही कमीत कमी तीन वर्षांपासून एनपीएस योजनेचे सबस्क्रायबर असणे गरजेचे आहे.
एका अर्थाने एनपीएस ही वृद्धांना आर्थिक सुरक्षा देणारी योजना आहे. यामध्ये दोन प्रकारची खाती आहेत - टियर 1 आणि टियर 2. टियर 1 हे निवृत्तीचे खाते आहे, तर टियर 2 हे ऐच्छिक खाते आहे. जर एखाद्या सदस्याने त्याच्या खात्यात निर्धारित किमान रक्कम जमा केली नाही, तर त्याचे एनपीएस खाते गोठवले जाऊ शकते. एनपीएसच्या टियर 1 आणि टियर 2 खात्यांमध्ये दरवर्षी ठराविक रक्कम जमा करावी लागते. तुम्ही ही रक्कम वेळेवर जमा न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. उदाहरणार्थ, टियर 1 खात्यात 500 रुपये आणि टियर 2 खात्यात 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
तुमचे एनपीएस खाते गोठवले असल्यास ते पुन्हा सक्रिय करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. सर्वप्रथम तुम्हाला युओएस-एस10-ए नावाचा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म पोस्ट ऑफिसमधून किंवा तुमचे एनपीएस खाते जेथे आहे, त्या ठिकाणाहून मिळू शकतो. याशिवाय तुम्ही ते ऑनलाईनही डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात थकबाकीची रक्कम जमा करावी लागेल. याशिवाय तुम्हाला 100 रुपये दंडही भरावा लागेल. फॉर्म आणि पेमेंटची पावती संबंधित कार्यालयात जमा करा. त्यानंतर अधिकार्यांकडून तुमचे खाते तपासले जाईल. सर्व माहिती बरोबर असल्यास तुमचे खाते पुन्हा सक्रिय केले जाईल.