Gold and Silver Prices Surge Again: देशातील गोल्ड मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजीचं वातावरण दिसत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे सोनं आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आज पुन्हा ₹10 ने वाढला असून दोन दिवसांत त्यात तब्बल ₹660 ची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचे भावही ₹610 ने वाढले आहेत.
चांदीच्या किमतींमध्येही जोरदार वाढ होत आहे. दिल्लीमध्ये चांदी आज प्रति किलो ₹3,100 ने वाढून ₹1,88,100 वर पोहोचली आहे. चेन्नईमध्ये चांदीचा भाव सर्वाधिक म्हणजे ₹1,96,100 प्रति किलो आहे, तर मुंबई पुणे आणि कोलकत्यात भाव ₹1,88,100 वर स्थिर आहे.
लग्नाच्या हंगामात सोन्या-चांदीची मागणी आधीच वाढलेली असताना किंमतींमधील ही तेजी ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनाही विचारात पाडणारी आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि व्याजदरांची अपेक्षित कपात या दोन्ही गोष्टी सोन्याला आधार देत आहेत. अशावेळी गुंतवणुकीचा निर्णय घेताना पुढील काही आठवडे बाजाराची दिशा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
गोल्डमन सॅक्सच्या सर्वेक्षणानुसार, जगभरातील जवळपास 70% संस्थात्मक गुंतवणूकदारांचे मत आहे की 2026 मध्ये सोने आणखी नवी उंची गाठणार आहे. 1 डिसेंबरला सोन्यात मोठी वाढ झाली, जी सहा आठवड्यांतील सर्वोच्च वाढ होती.
सर्वेक्षणातील 900 पेक्षा जास्त क्लायंट्सपैकी 36% जणांनी सांगितले की 2026 च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति औंस $5,000 च्या वर जाईल. तर एक तृतीयांश तज्ज्ञांचा अंदाज आहे की हा दर $4,500 ते $5,000 च्या दरम्यान राहील. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि व्याजदर धोरणे पाहता, आगामी काळातही सोन्या-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.