मांडवी नदीकिनारी पंचतारांकित वैद्यकीय हॉटेल साकारले जाणार आहे.  File Photo
अर्थभान

वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात गोव्याचे पहिले पाऊल

गोव्यात साकारले जाणार पंचतारांकित वैद्यकीय हॉटेल

पुढारी वृत्तसेवा
औदुंबर शिंदे

पणजी : गोव्याने वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात पहिले पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. रेईश मागूश येथे मांडवी नदीकिनारी सुमारे 31 हजार चौरस मीटर क्षेत्रात पंचतारांकित वैद्यकीय हॉटेल येत्या तीन वर्षांच्या आत साकारले जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रकल्प असून गुंतवणूक मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, श्रीपाद नाईक केंद्रीय पर्यटन मंत्री असताना हा प्रस्ताव आला आणि तो आता प्रत्यक्षात उतरत आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2016 मध्ये एका कंपनीचा या संदर्भात प्रस्ताव आला होता. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्याचे नाव जागतिक आरोग्य पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारत आहे. रेईश-मागूश येथील सर्व्हे क्रमांक 95/1 ए पार्टमध्ये हे पंचतारांकित हॉटेल कम हॉस्पिटल उभे राहणार आहे. त्यात आरोग्याशी संबंधित सर्व सुखसोयी असतील. त्या व्यतिरिक्त मनोरंजन सुविधाही असतील, तीन मजली कार पार्किंग इमारत, लँडस्केप इलुम्युनेशन प्रणालीत मांडवी नदीत म्युझिकल कारंज्याचे देखावे पहायला मिळतील. पणजीच्या तिरावरूनही हा नजारा पहायला मिळणार आहे.

वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय?

वैद्यकीय उपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:च्या देशातून दुसर्‍या देशात जात असेल तर या प्रक्रियेला वैद्यकीय पर्यटन म्हणतात. आपल्या देशात दरवर्षी लाखो लोक वैद्यकीय पर्यटनासाठी येतात. कमी पैशांमध्ये दर्जेदार आणि चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे उपचार घेण्यासाठी विकसित देशांतील लोक भारतात येत आहेत. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतात वैद्यकीय खर्च 30 टक्क्यांनी कमी आहे. मेडिकल टुरिझममध्ये भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू व कोची ही शहरे आघाडीवर आहेत. आशिया, आखाती देश आणि आफ्रिकन देशांमधून मोठ्या संख्येने रुग्ण वैद्यकीय पर्यटनासाठी भारतात येतात. देशातील पर्यटन क्षेत्रात मागील काही वर्षांत बरेच बदल झाले आहेत. कोरोना महामारीनंतर तर या क्षेत्राचा चेहराच पालटला आहे. परदेशी पाहुणे भारतात मौजमजा करणे, फिरणे किंवा सुट्ट्या घालवायला नव्हे तर स्वस्तात उपचार करून घेण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. कोरोना महामारीमुळे मागील तीन वर्षांत परदेशी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट झाली होती. 2023 मध्ये त्यात वाढ झाली आहे. मात्र, त्यांचे भारतात येण्यामागील कारण वेगळे आहे. पर्यटन मंत्रालयाची आकडेवारी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होते. उपचारांसाठी भारतात येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण तीनपटीहून जास्त नोंदविण्यात आले आहे. 45 पेक्षा जास्त वय असलेले नागरिक भारतात येण्याचे प्रमाण वाढले आहे.

‘प्रकल्प एक, महसूल अनेक’

देशात हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी किमान 5 ते 7 लाख रुपयांचा खर्च येतो. हाच खर्च परदेशात 15 ते 25 लाखांपर्यंत जातो. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठीही 5-9 लाखांचा खर्च येतो, तर परदेशात 15 ते 25 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. विदेशात प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा असतो, त्यामुळे या हॉटेलचे बिल विदेशी कंपनी देणार आहे. रुग्ण पर्यटकाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. राज्य सरकारला तिन्ही बाजूंनी महसूल मिळणार आहे. आरोग्य व वैद्यकीय सेवा हॉटेल आणि टुरिझम कर तसेच करमणूक कर मिळणार आहे. ‘प्रकल्प एक मात्र महसूल अनेक’ देणारा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास गोवा वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र व्हायला उशीर लागणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT