Gig Workers Strike Pudhari
अर्थभान

Gig Workers Strike: गिग वर्कर्सची मोठी घोषणा; आज संपूर्ण भारतात काम बंद आंदोलन, काय आहे कारण?

Gig Workers’ Bharat Bandh: ऑनलाइन डिलिव्हरी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सनी आज देशभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. योग्य मोबदला, सुरक्षित कामाचे वातावरण आणि मनमानी आयडी ब्लॉकिंगविरोधात हा संप करण्यात आला आहे.

Rahul Shelke

Gig Workers Nationwide Strike India: ऑनलाइन डिलिव्हरी अ‍ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सनी आपल्या मागण्यांसाठी आज, 3 फेब्रुवारी रोजी, संपूर्ण देशभरात काम बंद आंदोलन जाहीर केले आहे. वर्क कल्चर, स्थिर उत्पन्न आणि मनमानी कारवाईविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. गिग वर्कर्सचा आरोप आहे की, त्यांना मेहनतीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नाही आणि कोणतेही कारण न देता त्यांचे आयडी अचानक ब्लॉक केले जात आहे.

या संपात केवळ फूड आणि पार्सल डिलिव्हरी करणारे कामगारच नव्हे, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणारे ब्युटिशियन, स्पा व सलून कर्मचारी, घरगुती कामगार, साफसफाई कर्मचारी, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, एसी टेक्निशियन आणि कारपेंटर यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे अनेक शहरांमध्ये आज ऑनलाइन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

गिग वर्कर्स युनियनच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी 26 जानेवारीला आणि त्याआधीही अशा आंदोलनांचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेर आज राष्ट्रव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. Gig & Platform Service Workers Union (GIPSWU) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गिग वर्कर्स आज दुपारी एक वाजता दिल्लीतील जंतर मंतर येथे एकत्र येऊन निषेध आंदोलन करणार आहेत.

युनियनने केलेल्या आरोपांनुसार, गिग वर्कर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मनमानी पद्धतीने आयडी ब्लॉक केली जाणे, पारदर्शक नसलेली रेटिंग सिस्टिम, अस्थिर उत्पन्न आणि कामाच्या नियमांमध्ये वारंवार होणारे बदल, हे त्यातील प्रमुख मुद्दे आहेत.

महिला कामगारांनी वेतन किंवा कामाच्या अटींबाबत आवाज उठवला, तर त्यांना मानसिक त्रास दिला जातो, काही वेळा हिंसाचारालाही सामोरे जावे लागते, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. त्यानंतर अशा कामगारांची आयडी बंद करून त्यांना कामावरुन कमी केले जाते, असेही सांगण्यात आले आहे.

GIPSWUच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमा सिंह यांनी सांगितले की, युनियनने अनेकदा केंद्र सरकारशी संपर्क साधला, मात्र गिग वर्कर्सच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना स्वतंत्र केंद्रीय कायद्यांतर्गत मान्यता द्यावी, मनमानी आयडी ब्लॉक करण्यावर बंदी आणावी, पारदर्शक रेटिंग आणि काम वाटपाची व्यवस्था लागू करावी, तसेच योग्य उत्पन्नदर आणि तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशा प्रमुख मागण्या युनियनने मांडल्या आहेत.

सरकारने या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही गिग वर्कर्सनी दिला आहे. आजच्या या राष्ट्रव्यापी संपामुळे अनेक ऑनलाइन सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT