EPFO New PF Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी त्यांच्या पीएफ खात्यातून अधिक रक्कम काढता येणार आहे. सध्या पीएफ खात्यात किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. मात्र, आता ही मर्यादा 25 टक्क्यांवरून थेट 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
याशिवाय, निवृत्तीनंतर पीएफमधील संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी ठरावीक हप्त्यांमध्ये मिळवण्याची सुविधाही सुरू करण्याची तयारी EPFO करत आहे. तसेच नोकरी गेल्यानंतर पीएफची अंतिम रक्कम काढण्यासाठी प्रतीक्षा कालावधी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांचा फायदा देशातील कोट्यवधी पीएफ खातेधारकांना होऊ शकतो.
सध्या EPFO च्या नियमांनुसार, पीएफ खात्यातून काही रक्कम काढताना पात्र शिल्लक रकमेपैकी किमान 25 टक्के रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजेच खातेधारकाला संपूर्ण उपलब्ध रक्कम काढता येत नाही.
मात्र, आता ही अट बदलण्याचा प्रस्ताव केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) मंजूर केला आहे. नव्या प्रस्तावानुसार, पीएफ खात्यात किमान 10 टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागेल. त्यामुळे उर्वरित 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असतील, तर सध्याच्या 25 टक्के शिल्लक ठेवण्याच्या नियमानुसार त्याला 3.75 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. मात्र, नवीन नियम लागू झाल्यानंतर त्याला 4.50 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते. अर्थात, प्रत्यक्ष पैसे काढताना संबंधित कारण आणि EPFO चे इतर नियम लागू राहतील.