UPI-Based PF Withdrawal Facility: पीएफ खाताधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी अनेक आठवडे वाट पाहावी लागणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटना लवकरच यूपीआयद्वारे (UPI) पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर पीएफमधील पैसे काढणं मोबाईलवरून पैसे पाठवण्या इतकंच सोपं होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ पुढील 2 ते 3 महिन्यांत ही नवी व्यवस्था लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ईपीएफओने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी केली आहे. सुरुवातीला ही सेवा BHIM App वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सध्या पीएफमधून अॅडव्हान्स क्लेम केला, तर रक्कम खात्यात यायला किमान 3 दिवस लागतात. काही प्रकरणांत तर अधिक वेळ जातो. मात्र यूपीआय सुविधेमुळे इतका वेळ लागणार नाही.
नव्या व्यवस्थेत, सदस्याने आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न अशा कारणांसाठी क्लेम केला की, ईपीएफओची यंत्रणा लगेच तपासणी करेल. सर्व माहिती योग्य आढळल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्षणात पैसे यूपीआयशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जातील.
या सुविधेचा गैरवापर होऊ नये म्हणून सुरुवातीला रक्कमेवर मर्यादा (लिमिट) ठेवली जाण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआय व्यवहारांवर काही ठराविक मर्यादा घालून दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीला संपूर्ण पीएफ रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार नाही. एक ठराविक मर्यादा निश्चित केली जाईल. ही मर्यादा किती असेल, याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
सुरुवातीला ही सेवा फक्त BHIM App वर उपलब्ध असेल. मात्र चाचणी यशस्वी झाली, तर पुढील टप्प्यात PhonePe, Google Pay, Paytm यांसारख्या इतर यूपीआय अॅप्सवरही ही सुविधा सुरू केली जाऊ शकते.
पीएफ खातेदारांसाठी ही व्यवस्था म्हणजे वेळेची बचत, पैसा खात्यात येणं आणि कमी कागदपत्रांची झंझट... आपत्कालीन गरजांसाठी ही सुविधा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. एकूणच, ईपीएफओचा हा निर्णय लाखो नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारा आहे.