Ladki Bahin Yojana  Pudhari
अर्थभान

Ladki Bahin Scheme: महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेला ब्रेक? निवडणूक आयोगाचा आदेश

Ladki Bahin Scheme: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील जानेवारीचा आगाऊ लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. आचारसंहिता लागू असल्याने केवळ नियमित किंवा प्रलंबित रक्कमच देता येईल, असा आदेश देण्यात आला.

Rahul Shelke

Ladki Bahin Scheme Advance Payment: महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा आगाऊ हप्ता देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला आहे. आयोगाने सरकारला सांगितले की, सध्या केवळ नियमित किंवा आधी प्रलंबित असलेली रक्कमच देता येईल. मतदानापूर्वी पुढील महिन्याचा लाभ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संक्रांतीच्या मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये, म्हणजे एकूण 3 हजार रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागवला. राज्य सरकारची भूमिका अशी होती की, आगाऊ पैसे दिल्याने आचारसंहिता भंग होत नाही. मात्र, आयोगाने ही भूमिका मान्य केली नाही. निवडणुकीची पार्श्वभूमी आणि आदर्श आचारसंहिता लक्षात घेता, आगाऊ पैसे देण्यास बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट सांगितले की, या काळात योजनेत नवीन लाभार्थी जोडता येणार नाहीत. केवळ आधी मंजूर झालेले आणि नियमित स्वरूपातील लाभच देणे सरकारला शक्य आहे.

महिला मतदारांना संक्रांतीच्या मुहूर्तावर दिलासा देण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सरकारचा प्लॅन पूर्णपणे फसला आहे. त्यामुळे आता ‘लाडकी बहीण’ योजनेतील जानेवारी महिन्याची रक्कम महिलांना मतदानानंतरच मिळणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT