Zerodha 43 Crore Controversy Pudhari
अर्थभान

Zerodha Controversy: 43 कोटींचा गुंतवणूकदार डॉक्टर चर्चेत! ‘झेरोधा'ला म्हणाला स्कॅम, सोशल मीडियावर पेटला वाद

Zerodha 43 Crore Controversy: मुंबईतील डॉ. अनिरुद्ध मालपानी यांनी आपल्या Zerodha खात्यातील 43 कोटी रुपयांबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की कंपनीने त्यांना 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम काढू दिली नाही.

Rahul Shelke

Zerodha 43 Crore Controversy: मुंबईतील प्रख्यात डॉक्टर आणि गुंतवणूकदार डॉ. अनिरुद्ध मालपानी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या डीमॅट खात्यात तब्बल 43 कोटी रुपये आहेत, आणि त्यांनी देशातील सर्वाधिक लोकप्रिय ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी झेरोधा (Zerodha) वर गंभीर आरोप केले आहेत.

डॉ. मालपानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “हा झेरोधाचा स्कॅम आहे! माझे स्वतःचे पैसे मला काढू देत नाहीत. झेरोधावाले सांगतात की एका दिवसात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. माझे पैसे ते फुकट वापरत आहेत.” त्यांनी ही पोस्ट थेट झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांना टॅग केली आहे आणि उत्तर मागितले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डॉ. मालपानी हे व्यावसायिकदृष्ट्या IVF स्पेशॅलिस्ट डॉक्टर असून त्याचबरोबर एक एंजल इन्व्हेस्टर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला Zerodha अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर केला.

त्यात दिसत होते की त्यांच्या खात्यात एकूण ₹42.9 कोटी रुपये आहेत, त्यापैकी सुमारे ₹24.46 कोटी ट्रेडमध्ये गुंतवले आहेत आणि ₹18.46 कोटी ‘withdrawable balance’ म्हणून उपलब्ध आहेत. डॉ. मालपानींचा आरोप होता की, त्यांनी 5 कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता झेरोधाने व्यवहार नाकारला आणि एका दिवसातील विड्रॉ लिमिटचे कारण सांगितले.

निखिल कामत यांचे स्पष्टीकरण

या पोस्टनंतर झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. मालपानींची पेमेंट प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यांनी स्पष्ट केले की, “5 कोटी रुपयांची विड्रॉ लिमिट ही सुरक्षेच्या आणि सिस्टिम स्थिरतेच्या दृष्टीने ठेवलेली मर्यादा आहे. प्रत्येक आर्थिक संस्थेकडे अशी काही मर्यादा असणे आवश्यक असते, कारण मोठ्या रकमेचे व्यवहार परत मिळवणे अशक्य असते.” कामत यांनी म्हटले की, “ही कोणतीही चूक किंवा स्कॅम नाही. उलट, हे सुरक्षेसाठी असलेले आवश्यक नियंत्रण आहे.”

सोशल मीडियावर खळबळ

या घटनेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. काहींनी डॉ. मालपानींच्या खात्यात इतका पैसा कसा, असा प्रश्न उपस्थित केला; तर काहींनी त्यांना इतक्या मोठ्या रकमेसाठी डिस्काउंट ब्रोकरेजवर विश्वास ठेवणे योग्य आहे का, असा प्रश्न विचारला.

टॅक्स कॉम्पासचे संस्थापक आणि करतज्ज्ञ अजय रोटी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही कोणतीही फसवणूक नाही, तर सुरक्षा धोरण आहे. प्रत्येक वित्तीय संस्थेला काही मर्यादा ठेवाव्याच लागतात.”

त्यांनी पुढे सांगितले, “बँका आणि UPI सिस्टीममध्येही दररोजच्या व्यवहाराची मर्यादा असते. त्यामुळे कोणतीही चूक किंवा फसवणूक झाल्यास मोठा तोटा होऊ नये, यासाठीच हे बंधन आवश्यक असते.”

कोण आहेत डॉ. अनिरुद्ध मालपानी?

डॉ. मालपानी हे IVF आणि वंध्यत्व उपचारतज्ज्ञ असून त्यांनी 1991 साली मुंबईत ‘मालपानी इन्फर्टिलिटी क्लिनिक’ ची स्थापना केली. ते गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअप गुंतवणुकीत सक्रिय आहेत आणि आतापर्यंत 30 हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या गुंतवणुकीत हेल्थकेअर, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन सेक्टरचा समावेश आहे. अलीकडे त्यांनी Nexxio नावाच्या कंपनीतही गुंतवणूक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT