DK Shivakumar Net Worth Pudhari
अर्थभान

DK Shivakumar Net Worth: फक्त एक कार नावावर; 263 कोटी रुपयांचं तर कर्जच आहे, डीके शिवकुमार यांची संपत्ती किती?

DK Shivakumar Net Worth: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे 2023 च्या प्रतिज्ञापत्रानुसार 1,413.78 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

पुढारी वृत्तसेवा

DK Shivakumar Net Worth: कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या सत्ताबदलाच्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, DK शिवकुमार किती श्रीमंत आहेत?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल 1,413.78 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

विशेष म्हणजे, 2018 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 2018 मध्ये त्यांनी सुमारे 840.08 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. म्हणजेच अवघ्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

मात्र, केवळ संपत्तीच नाही तर मोठे कर्जही त्यांच्या नावावर आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, डी. के. शिवकुमार यांच्यावर सुमारे 263 कोटी रुपयांची देणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कुठे केली गुंतवणूक?

DK शिवकुमार यांची आर्थिक ताकद केवळ बँक बॅलन्सपुरती मर्यादित नाही. त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, कुटुंबाकडे 273.42 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता (Movable Assets) आहे. यामध्ये रोख रक्कम, बँक ठेवी, गुंतवणूक, दागिने आणि इतर मालमत्तांचा समावेश होतो.

तर 1,140.36 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता (Immovable Assets) असल्याचे नमूद आहे. जमीन, इमारती आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे मानले जाते. यातील फक्त DK शिवकुमार यांच्या वैयक्तिक नावावरच 972.65 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

अब्जाधीश, पण गाडी एकच

विशेष म्हणजे, हजारो कोटींच्या संपत्तीचे मालक असतानाही DK शिवकुमार यांच्या नावावर केवळ एकच नोंदणीकृत कार आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे जुनी Toyota Qualis ही कार आहे.

मात्र, लक्झरी घड्याळांची त्यांना विशेष आवड असल्याचे दिसते. त्यांच्या मालकीच्या वस्तूंमध्ये Rolex आणि Hublot सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडची महागडी घड्याळे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचीही नोंद करण्यात आली आहे.

काँग्रेसचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळख

DK शिवकुमार यांचा राजकीय प्रवासही तितकाच चर्चेचा आहे. 1980 च्या दशकात त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1989 मध्ये पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेत निवडून आले. सध्या ते कनकपुरा मतदारसंघाचे आमदार असून कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत.

ऊर्जा, नगरविकास यांसारखी महत्त्वाची मंत्रालये त्यांनी यापूर्वी सांभाळली आहेत. काँग्रेस पक्षात त्यांना ‘संकटमोचक’ म्हणून पाहिले जाते. 2017 मध्ये गुजरातमधील काँग्रेस आमदारांना फोडाफोडीपासून वाचवण्यासाठी बंगळुरूतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. त्या संपूर्ण रणनीतीमुळे DK शिवकुमार राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते.

2023 मध्ये काँग्रेसला कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वाधिक पुढे असल्याने त्यांच्याविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT