Stock Markets Today Budget 2026 Pudhari
अर्थभान

Stock Market Crash: अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 2,300 पेक्षा जास्त अंकांनी खाली, BEL 10 टक्के घसरला

Stock Market Crash Today: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 2,300 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 25,000 च्या खाली गेला.

Rahul Shelke

Stock Market Crash Today: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प शेअर बाजाराला फारसा पसंत पडलेला दिसला नाही. अर्थसंकल्प जाहीर होताच शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि प्रमुख निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले.

बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल 2,300 अंकांहून अधिक घसरण झाली. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री बजेट भाषण सुरू असताना सेन्सेक्स सुमारे 400 अंकांच्या तेजीमध्ये होता. मात्र भाषण संपेपर्यंत बाजाराचा सूर पूर्णपणे बदलला आणि सेन्सेक्स मोठ्या घसरणीसह खाली आला. दुपारी 12.40 वाजता सेन्सेक्स 1,035 अंक म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 81,234 अंकांवर पोहोचला.

त्याचवेळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 निर्देशांकही 332 अंक म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 24,988 अंकांवर व्यवहार करत होता.

सुरुवातीला तेजी, नंतर अचानक घसरण

आज रविवार असला तरी अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार सुरु होता. बाजारात सकाळी सुरुवातीला चढ-उतार पाहायला मिळाले. काही वेळासाठी बाजारात तेजीही दिसून आली. सकाळी 11.13 वाजता सेन्सेक्स 387 अंकांच्या तेजीसह 82,657 अंकांवर, तर निफ्टी 90 अंकांच्या वाढीसह 25,411 अंकांवर व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने बाजार पूर्णपणे लाल रंगात गेला.

संरक्षण आणि PSU शेअर्सवर दबाव

अर्थसंकल्पानंतर संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) चा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी घसरला, त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. इतर अनेक पीएसयू आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही घसरले.

अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे शेअर्समध्ये चढ-उतार

अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांना रेल्वे क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे काही रेल्वे शेअर्समध्ये सुरुवातीला हालचाल दिसली. आरव्हीएनएल, आयआरएफसी, आयआरसीटीसी, इरकॉन आणि टिटागढ रेल सिस्टीम्स या शेअर्समध्ये काही काळ तेजी पाहायला मिळाली. मात्र एकूण बाजार घसरल्याचा परिणाम या शेअर्सवरही नंतर दिसून आला.

MCX च्या शेअर्समध्ये मोठी पडझड

सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा फटका MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) च्या शेअरला बसला. MCX च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांचा लोअर सर्किट लागला आणि शेअर थेट घसरून खाली आला. जागतिक बाजारात डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांकडून नफावसुली झाल्यामुळे सोने-चांदीच्या किमती कोसळल्या, त्याचा थेट परिणाम MCX वर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT