Plastic pollution and respiratory diseases (File Photo)
आरोग्य

World Environment Day | मायक्रोप्लास्टिक, नॅनोप्लास्टिक आणि श्वसनविकार

Plastic pollution | आपल्या अवतीभोवती दुर्दैवाने एक गंभीर वास्तव दडले आहे आणि ते म्हणजे प्लास्टिक हे अनेक वर्षे पृथ्वीवरून नष्टहोत नाही.

पुढारी वृत्तसेवा
डॉ. अनिल मडके

प्लास्टिक हे अनेक वर्षे पृथ्वीवरून नष्ट होत नाही. प्लास्टिकमुळे केवळ समुद्र, नद्या, माती, अन्न इतकेच प्रदूषित होत नाही तर प्लॅस्टिकमुळे हवेचे प्रदूषण होते. याचे सूक्ष्मकण श्वासावाटे सहजपणे श्वासनलिकेत आणि फुफ्फुसात जातात. या मायक्रोप्लास्टिकमुळे केवळ फुफ्फुसच नव्हे तर इतर अवयवांत देखील कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

Environmental Health

आपल्या अवतीभोवती दुर्दैवाने एक गंभीर वास्तव दडले आहे आणि ते म्हणजे प्लास्टिक हे अनेक वर्षे पृथ्वीवरून नष्टहोत नाही. प्लास्टिकमुळे केवळ समुद्र, नद्या, माती, अन्न इतकेच प्रदूषित होत नाही तर प्लॅस्टिकमुळे हवेचे प्रदूषण होते. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. आणि यावर्षीचे घोषवाक्य आहे , ‘चला प्लास्टिकचे प्रदूषण संपवूया’ (एन्ड प्लास्टिक पोल्यूशन). प्लास्टिक प्रदूषणापैकी मायक्रोप्लास्टिक म्हणजे, पाच मिलिमीटर पेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिकचे तुकडे किंवा तंतू. वायू प्रदूषणाच्या पातळीतील 2.5 पी. एम. म्हणजे वातावरणातील 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या कणांची संख्या. एक मायक्रॉन म्हणजे एक मायक्रोमीटर म्हणजेच एक मिलिमीटरचा हजारावा भाग. या आकाराचे सूक्ष्मकण श्वासावाटे सहजपणे श्वासनलिकेत आणि फुफ्फुसात जातात.

जेव्हा हे कण आकाराने एक मायक्रॉन पेक्षाही कमी असतात, तेव्हा ते सहजपणे वायुकोशात तरंगत राहतात आणि याहून कमी आकाराचे सूक्ष्म कण म्हणजे काही कण हे 0.1 मायक्रॉन म्हणजे 100 नॅनोमीटर या आकाराचे असतात. (शंभर नॅनोमीटर म्हणजे कोविड विषाणूचा आकार हे वाचकांनी लक्षात घ्यावे) तर असे हे सूक्ष्म कण चक्क रक्तवाहिन्यांमध्ये मिसळतात आणि शरीरात कोणत्याही अवयवावर गंभीर परिणाम करतात.

एका अंदाजानुसार, प्रौढ व्यक्ती दरवर्षी सुमारे 2.2 कोटी सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म प्लास्टिक कण नाकावाटे फुफ्फुसात घेत असते. या सूक्ष्म प्लास्टिकच्या रासायनिक गुणधर्मानुसार ते फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करतात.

सूक्ष्म प्लास्टिक जैवतटस्थ (बायोन्यूट्रल) नसतात. सूक्ष्म प्लास्टिकच्या कडा असमान असतात. त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामुळे ते इतर अनेक विषारी कण, सेंद्रिय घटक शोषून घेऊ शकतात. सूक्ष्म प्लास्टिक मधील पॉलिस्टायरिन आणि पॉलिप्रॉपिलीन तंतू हे फुफ्फुसांतील श्लेषमल पटलावर परिणाम करून दाह निर्माण करतात. शरीरातील सूक्ष्म पेशींमध्ये असणार्‍या मायटोकाँड्रिया नावाच्या ऊर्जा निर्मिती मधील अत्यंत महत्त्वाच्या पेशीघटकावर परिणाम करतात. प्रसंगी डीएनएचे तंतू तोडतात. शरीरातील पांढर्‍या पेशींकडून दाहनिर्मिती करणारी वेगवेगळी रसायने रक्तात सोडली जातात. फायब्रोसिस ही प्रक्रिया सुरू होते. मायक्रो प्लास्टिकमधील बिस्फेनॉल ए , फ्थॅलेटस् इत्यादी अंतःस्रावी विघटन क्रिया घडवतात.

शरीरात नवपेशी निर्मितीची क्रिया अखंडपणे सुरू असते आणि त्याचवेळी ज्या पेशींचे शरीरातील कार्य संपले आहे, त्यांचा मृत्यू होत असतो. पण मायक्रोप्लास्टिकमुळे पेशी मृत्यू पावण्याची प्रक्रिया वेग घेते. मायक्रोप्लास्टिकमुळे केवळ फुफ्फुसच नव्हे तर इतर अवयवांत देखील कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

वाहनांच्या टायरचे झिजलेले रबर, सिंगल-यूज प्लास्टिकचे म्हणजे अगदी पातळ असलेल्या रस्त्यावर कुठेही टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या छिन्नभिन्न होताना तयार होणारे सूक्ष्मकण, बांधकामातून उडणारी धूळ, सर्व प्रकारचा प्लास्टिकचा कचरा, घरातील सिंथेटिक कपडे, पडदे, कार्पेटस् यांच्या घर्षणामुळे हवेत तरंगणारे पॉलिस्टर, अ‍ॅक्रॅलिक तंतू हे प्लास्टिक धोकादायक आहे.

कारखाने, कापड-तंतू उद्योग, प्लास्टिक रिसायकलिंग युनिट, कचरा जाळणारे प्रकल्प, थ्रीडी प्रिंटिंग इ. उद्योग. ज्या व्यक्ती वर नमूद केलेल्या उद्योगात काम करतात किंवा दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे रस्त्यावर किंवा प्रदूषित ठिकाणी असतात आणि एन-95 सारखे मास्क प्रदूषित ठिकाणी वापरत नाहीत, त्यांना दमा, सीओपीडी, लंग फायब्रोसिस एवढेच नव्हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याच्या शक्यता वाढतात. श्वसनक्षमता कमी कमी होत जाते. म्हणून असे मायक्रोप्लास्टिक नाकात जाऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी.

तसे प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम आहेत. पण इथे केवळ मायक्रोप्लास्टिकचे फुफ्फुसांवरील दुष्परिणाम दाखवून दिले आहेत. आरोग्य सांभाळायचे असेल तर, प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा. प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिणे टाळायला हवे. प्लास्टिकच्या कंटेनरमधून किंवा पिशवीमधून अन्नपदार्थ आणून खाणे टाळावे. चहासारखे पेय प्लास्टिकच्या कपातून पिऊ नये. घरात प्लास्टिकचा आणि सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारावे. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक कचरा टाकू नये. अत्यावश्यक असेल तेव्हा, रियूजेबल किंवा रिसायक्लेबल प्लास्टिक वापरावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कितीही सोयीचे सोपे आणि स्वस्त असले तरी प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरण्याची सवय करा आणि इतरांना तशी सवय लावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT