Mosquito Bite Study : काही लोकांवर डासांची फौज तुटून पडते, तर काही व्यक्तींच्या आसपासही डास फिरकत नाहीत... असा अनुभव तुम्हीही अनेकदा घेतला असेल. पण, यामागे कोणताही योगायोग नसून एक वैज्ञानिक कारण आहे! काही लोकांनाच डास का जास्त चावतात, या प्रश्नाचे उत्तर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध रॉकफेलर युनिव्हर्सिटीच्या (Rockefeller University) संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. यासंदर्भात अत्यंत थक्क करणारा खुलासा झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, डासांच्या चावण्यामुळे होणारे विविध आजार आणि संसर्गांमुळे जगभरात दरवर्षी ७ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातच आता जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) या आजारांचा धोका अधिक पटीने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
२०२२ मध्ये प्रसिद्ध 'सेल' (Cell) या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ज्यांच्या त्वचेवर विशिष्ट प्रकारच्या ॲसिड्सचे प्रमाण जास्त असते, त्यांच्याकडे 'एडिस इजिप्ती' जातीच्या मादी डास इतर सामान्य माणसांपेक्षा १०० पटीने जास्त आकर्षित होतात. विशेष म्हणजे, हीच डासांची प्रजाती डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका आणि यलो फीव्हर यांसारख्या अत्यंत जीवघेण्या आजारांचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरते.
गरोदर महिला, बिअर पिणाऱ्या व्यक्ती आणि विशिष्ट साबण वापरणाऱ्या लोकांकडेही डास लवकर आकर्षित होतात, असे संशोधनातून समोर आले होते. या माहितीमुळे डास नेमक्या कसल्या वासाकडे आकर्षित होतात, यावर आता अधिक संशोधन सुरू झाले. 'एडिस इजिप्ती' डासांना काही लोकांच्या शरीराचा वास इतरांपेक्षा जास्त आवडण्यामागचे नेमके कारण शोधण्याचा निर्णय रॉकफेलर युनिव्हर्सिटीतील संशोधक वॉशॉल यांनी घेतला. प्रयोगादरम्यान संशोधकांनी लोकांच्या हातावर नायलॉनचे मोजे घालून त्यांच्या त्वचेचा नैसर्गिक वास त्या मोज्यांवर गोळा केला. त्यानंतर या मोज्यांचे दोन-दोन इंचांचे छोटे तुकडे कापून ते एका प्लास्टिकच्या पेटीत बनवलेल्या दोन वेगवेगळ्या दरवाजांमागे ठेवले. या पेटीत अनेक डास सोडलेले होते. दरवाजा उघडताच डास कोणत्या मोज्याकडे जास्त पळतात, हे पाहून डासांना नेमका कोणाचा वास जास्त आवडतो, हे संशोधकांच्या निदर्शनास आले.
डासांना कोणाचा गंध (वास) सर्वात जास्त आवडतो, हे शोधण्यासाठी संशोधकांनी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. रॉकफेलर युनिव्हर्सिटीच्या संशोधक वॉशॉल यांच्या मते, बास्केटबॉलच्या सामन्याप्रमाणे डासांची ही 'राउंड-रॉबिन' स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जेव्हा जेव्हा डास एखाद्या व्यक्तीच्या वासाकडे आकर्षित व्हायचे, तेव्हा त्या वासाला गुण (पॉइंट्स) दिले जायचे. या प्रयोगात 'सब्जेक्ट ३३' (प्रयोगातील ३३ व्या क्रमांकाची व्यक्ती) यांच्या शरीराच्या वासाने डासांना अक्षरशः वेड लावले! "सब्जेक्ट ३३ ने सलग १०० सामने जिंकले. ते या प्रयोगात पूर्णपणे अजिंक्य राहिले. त्यांना डासांच्या बाबतीत कोणीही हरवू शकले नाही," असे वॉशॉल यांनी गमतीने सांगितले.
आपल्या त्वचेवर असणारा एक नैसर्गिक घटक आणि डासांचे चावणे, याचा थेट संबंध आहे. आपल्या सर्वांच्याच त्वचेवर 'सीबम' नावाचा मेणासारखा एक तेलकट थर असतो. या थरापासून शरीरात 'कार्बोक्झिलिक ॲसिड' तयार होते. गंमत म्हणजे, आपल्या त्वचेवर कोट्यवधी सूक्ष्मजीव (जिवाणू) राहत असतात. हे जिवाणू त्वचेवरील 'सीबम' खातात आणि त्यातून आणखी ॲसिड तयार करतात. संशोधक वॉशॉल यांच्या मते, शरीरावर हे ॲसिड जास्त प्रमाणात तयार झाल्यास त्याचा वास काहीसा चीज (Cheese) किंवा घाणेरड्या पायांच्या वासासारखा येतो. रक्ताच्या शोधात भटकणाऱ्या मादी डासांना हाच वास सर्वाधिक आवडतो!, असेही वॉशॉल यांनी आपल्या संशोधनात नमूद केले होते.
प्रयोगादरम्यान वापरलेल्या मोज्यांना अजिबात घामाचा वास येत नव्हता. डासांची वासाची क्षमता इतकी तीव्र असते की, महागडा परफ्यूम किंवा सेंट मारूनही आपल्या शरीराचा हा नैसर्गिक वास डासांपासून लपवता येत नाही. हा प्रयोग तब्बल तीन वर्षे चालला. या काळात प्रयोगातील लोकांनी काहीही खाल्ले-पिल्ले किंवा साबण-शॅम्पू बदलला, तरी डास त्यांच्याकडे आधीसारखेच आकर्षित होत राहिले. थोडक्यात सांगायचे तर, तुमच्या शरीराचा हा वास बदलणे सहजासहजी शक्य नाही!
"केवळ श्वास घेण्याद्वारेच आपण डासांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो," असे 'हॉवर्ड ह्युजेस मेडिकल इन्स्टिट्यूट'च्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक लेस्ली वॉशॉल यांनी २०२२ मध्ये सांगितले होते. मादी डासांची शरीररचनाच अशा प्रकारे झाली आहे की त्या रक्तासाठी चावा घेतात; कारण रक्ताशिवाय त्यांना प्रजननासाठी आवश्यक असलेली प्रथिने (प्रोटीन) मिळत नाहीत. "एका मिनिटाच्या कालावधीत १५० पाउंड अन्नाइतके पोषण मिळवण्याचा आणि त्याचा वापर अंडी तयार करण्यासाठी करण्याचा हा त्यांच्यासाठी एक मार्ग आहे."
या संशोधनाच्या आधारे मानवी शरीराचा विशिष्ट गंध लपवणारी किंवा तो बदलणारी नवी उत्पादने विकसित करणे शक्य होईल, असा विश्वास संशोधक वॉशॉल यांनी व्यक्त केला होता. आपल्या त्वचेवरील जिवाणू (बॅक्टेरिया) जो वास तयार करतात, त्यात भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा बदल करता येईल, हे शोधणे आता महत्त्वाचे ठरेल. अशी उत्पादने बाजारात आल्यास डासांना मानवी रक्ताचा सुगावा लावणे कठीण होईल. परिणामी, डासांच्या चावण्यामुळे पसरणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या प्रसाराला प्रभावीपणे आळा घालण्यास मोठी मदत मिळेल.
डासांचा चावा आणि मानवी शरीराचा गंध यावरील संशोधनाबाबत वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्र प्राध्यापक आणि डास अभ्यासक जेफ रिफेल यांनी एक गंभीर इशाराही दिला आहे. त्यांच्या मते, वाढत्या तापमानामुळे डासांच्या प्रसाराला पोषक वातावरण मिळत आहे. 'एडिस इजिप्ती' ही डासांची प्रजाती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय किंवा उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. मात्र, बदलत्या हवामानामुळे आता अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. आणि कॅलिफोर्नियासारख्या भागातही हे डास वर्षभर अंडी घालून आपली संख्या वाढवत आहेत.
डास केवळ एकाच वासामुळे आकर्षित होतात का? तर याचे उत्तर 'नाही' असे आहे. या संशोधनात सहभागी नसलेले व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्र प्राध्यापक एल. जे. झ्वाईबेल यांच्या मते, अभ्यासात 'कार्बोक्झिलिक ॲसिड'ची भूमिका महत्त्वाची दिसून आली असली, तरी डासांना आकर्षित करणारी कोणतीही 'एकच गोष्ट' नाही. एखाद्या माणसाकडे खेचले जाण्यासाठी आणि त्याला चावण्यासाठी डासांना वेगवेगळ्या घटकांचे एक 'मिश्रण' (कॉकटेल) आकर्षित करत असते. कार्बोक्झिलिक ॲसिड हा डासांना आकर्षित करणारा एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे, पण तो एकमेव घटक नाही. दरम्यान, 'नेचर' (Nature) नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले होते की, डास लोकांचा शोध घेण्यासाठी इन्फ्रारेड किरणांचाही वापर करतात.