Brain Health : दोन वर्षांपर्यंतच्या बाळांना साखरेपासून ठेवा दूर; स्मृतीभ्रंशाच्या धोक्याबाबत नवीन संशोधन काय सांगते?

नव्या संशोधनात दावा, आयुष्याचे पहिले १,००० दिवस भावी आरोग्यासाठी अत्यंत निर्णायक
Brain Health First 1000 days
Brain Health First 1000 daysAI-generated image
Published on
Updated on

Brain Health First 1000 days : लहानपणीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या संपूर्ण आयुष्यावर कसा प्रभाव पाडतात, याचा एक नवा आणि महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांत मुलांना अतिशय कमी साखर दिल्यास, त्याचा फायदा त्यांच्या मेंदूच्या आरोग्याला अनेक दशकांनंतरही होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

संशोधनात काय आढळले?

'न्यूरॉलॉजी' (Neurology) या वैद्यकीय नियतकालिकात (Journal) प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ज्या मुलांनी जन्मापासूनच्या सुरुवातीच्या काळात रेशनिंगमुळे कमी साखर खाल्ली होती, त्यांना उतारवयात डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) होण्याचा धोका तब्बल २३ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर, अशा व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे इतर लोकांच्या तुलनेत अडीच वर्षे उशिरा दिसून आली. आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवल्यास मेंदूच्या आरोग्याला दीर्घकालीन आणि मोठे फायदे मिळू शकतात, असे हॉंगकॉंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील अभ्‍यासाचे मुख्‍य संशोधक जियाझेन झेंग यांनी म्‍हटले आहे.

Brain Health First 1000 days
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

पहिले १,००० दिवस अत्यंत महत्त्वाचे

आयुष्याचे पहिले १,००० दिवस (गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत) हे भावी आरोग्यासाठी अत्यंत निर्णायक असतात, हे यापूर्वीच्या अभ्यासांमधूनही स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर १९५३ मध्ये ब्रिटनमध्ये साखरेवरील रेशनिंग उठवल्यानंतर, लोकांचा दैनंदिन साखर वापर एकाएकी दरडोई ४१ ग्रॅमवरून (सुमारे १० साखरेचे ठोकळे) थेट ८० ग्रॅमवर (२० साखरेचे ठोकळे) पोहोचला होता. युके बायोबँकच्या सुमारे ६५,००० लोकांच्या वैद्यकीय माहितीचा वापर करून संशोधकांनी या काळातील मुलांच्या आरोग्याचा सखोल अभ्यास केला होता.

तज्ज्ञांचे मत काय ?

या संशोधनाकडे तज्ज्ञ एका सकारात्मक दृष्टीने पाहत असले, तरी थेट निष्कर्षावर येण्यापूर्वी अधिक अभ्यासाची गरज असल्याचे स्‍पष्‍ट करत आहेत. आरोग्यदायी आहार हा नेहमीच लाभदायक: कॉक्रेन संस्थेच्या तज्ज्ञ रॅचेल रिचर्डसन यांच्या मते, लहानपणी खाल्लेली साखरच डिमेंशियाला थेट कारणीभूत आहे असा ठोस पुरावा यातून मिळत नाही. ८० वर्षांपूर्वीच्या मुलांचे संगोपन आणि आजच्या मुलांचे अन्नपान यात खूप फरक आहे.

Brain Health First 1000 days
Nagpur health news: खैरी येथील आरोग्य स्थिती नियंत्रणात,अफवांवर विश्वास ठेवू नका; डॉ गहलोत

इतर घटकांचाही प्रभाव

ॲस्टन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक इयान मेडमेंट यांच्या मते, ८० वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा थेट आजच्या आरोग्याशी संबंध जोडताना इतर अनेक जीवनशैलीचे घटकही कारणीभूत असू शकतात. तर 'अल्झायमर रिसर्च युके'च्या डॉ. सारा रॉड्रिग्ज स्पष्ट करतात, "हा एक निरीक्षणात्मक अभ्यास आहे. त्यामुळे कमी साखर खाल्ल्याने डिमेंशिया १००% टळतोच असे नाही. परंतु, मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी संतुलित आणि नैसर्गिक आहार घेणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news