DS Tb Treatment observation
शैलजा तिवले
टीबी - मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसिल या डोळ्यांनीही न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवाणूपासून पसरणारा हा आजार. तसा सूक्ष्म वाटणारा हा जीवाणू गेली अनेक दशके आपल्या देशात ठाण मांडून बसला आहे. टीबी हारेगा, देश जीतेगा अशा किती घोषणा आपण दिल्या तरी तो काही हरायचं नाव घेत नाही. आता तर औषधांना दाद देणाऱ्या साध्या टीबीनं देखील आपलं रुपड बदललं आहे. या आजाराची औषधे काही रुग्णांमध्ये म्हणावी तशी प्रभावशाली ठरत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या टीबीला कसं बर आटोक्यात आणणार? भविष्यात अजून काही बदल झाल्यास याला कसं रोखणार अशा एका ना अनेक धोक्याच्या घंटा हा आजार देत आहे.
ड्रग सेन्सिटिव्ह डीएस टीबी म्हणजे काय?
रुग्णाला टीबीची बाधा झाल्याचे तपासणीमध्ये आढळ्यावर जीनएक्सपर्ट चाचणीमध्ये औषधांना दाद देणारा - ड्रग सेन्सिटिव्ह (DS) की दाद न देणारा – ड्रग रेझिस्टंट (DR) टीबी आहे हे तपासले जाते आणि त्यानुसार औषधे सुरू केली जातात. डीएस टीबीमध्ये चार औषधांची (रिफाम्पिसिन, पॅराझिनामाईड, आयसोनाझाईड आणि इथंब्युटॉल) एकत्रित एकच गोळी दिली जाते. याची मात्रा रुग्णाच्या वजनानुसार ठरवली जाते. परंतु अलीकडे काही रुग्णांमध्ये वजनानुसार दिलेली मात्रा प्रभाववाशाली ठरत नसल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दोन महिने रुग्णांला औषधे देऊनही प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा होत नाही आणि रुग्णामध्ये औषधांसाठीचा प्रतिरोधही ही नाही मग असे का घडते याचा शोध घेत असताना टीबीच्या औषधांमधील काही औषधांचे रुग्णाच्या शरीरात आवश्यक पद्धतीने शोषण होत नसल्याचे डॉक्टरांना आढळले आहे.
डीएसच्या टीबीच्या बदलत्या स्वरुपामुळे रुग्णाला त्याच्या वजनानुसार आवश्यक मात्रेमध्ये दिलेली औषधे प्रभावहीन ठरत आहेत, असे मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसीच्या चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयातील फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि टीबीविषयक राष्ट्रीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य. डॉ. विकास ओसवाल यांनी नोंदविले आहे.
संशोधनात्मक अभ्यासानुसार, उपचाराला अपेक्षित प्रतिसाद न मिळण्यामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तातील औषधांच्या पातळीत होणारी तफावत. अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, रुग्णाच्या वजनानुसार औषधांची प्रमाणित मात्रा दिली तरी सर्व रुग्णांमध्ये रिफॅम्पिसिन आणि आयसोनियाझिड या औषधांची रक्तातील उपचारात्मक गाठली जात नाही औषधांचे शरीरातील शोषण, वितरण आणि चयापचय यामध्ये व्यक्तिनुसार फरक असतो. त्यामुळे रुग्ण उपचार नियमितपणे घेत असतानाही काही वेळा रक्तातील औषधांची पातळी उपचारासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा कमी राहू शकते. शरीराचे वजन, आजाराची तीव्रता, जठरांत्रमार्गातून औषधांचे होणारे शोषण, इतर आजार आणि औषधांच्या चयापचयावर परिणाम करणारे आनुवंशिक बदल यांसारख्या घटकांमुळे रक्तातील औषधांची पातळी प्रभावित होऊ शकते.
चेन्नईमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, प्रमाणित वजनानुसार औषधांचा डोस घेत असलेल्या फुफ्फुसीय, एक्स्ट्रापल्मोनरी (फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये झालेला) आणि डेसिमिनेटेड टीबीच्या रुग्णांमध्ये रिफॅम्पिसिन आणि आयसोनियाझिड या औषधांची रक्तातील पातळी उपचारासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा कमी असण्याचे प्रमाण मोठे आहे. मागच्या लेखात आपण पाहिलं होत की डेसिमिनेटेड टीबीचे प्रमाण वाढत आहे आणि या अशारितीने टीबीचे रुप बदलल्याने औषधाचा प्रभावही कमी होत आहे.
डॉ. ओसवाल सांगतात, मुंबईत आम्ही आता अशा रुग्णांची थेरप्युटीक ड्रग मॉनिटर (टीडीएम) चाचणी करून कोणती औषधे रक्तात शोषली जात नाहीत किंवा कमी प्रमाणात शोषली जातात हे तपासून घेतो आणि त्यानुसार आवश्यक औषधांची मात्रा वाढविली जाते आणि सातत्याने रुग्णांचे निरीक्षण केले जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वजनापेक्षा अधिक औषधांची मात्रा दिल्याने यकृत, मूत्रपिंड यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या रुग्णांच्या सर्व तपासण्या वरचेवर करणे, दुष्परिणांवर लक्ष ठेवणे यासाठी बारकाईने लक्ष द्यावे लागते. डॉ. ओसवाल सांगतात, या रुग्णांमध्ये चार औषधांपैकी जे योग्यरितीने शोषले जात नाही. त्याचीच मात्रा वाढविली जाते. त्यामुळे अद्याप तरी कोणतेही दुष्परिणाम रुग्णांमध्ये आढळलेले नाहीत. रुग्णांचे उपचार पूर्ण होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचे डॉ. ओसवाल यांनी नमूद केले आहे.
टीडीएम चाचणी महागडी असल्याने न परवडणारी
डीएसच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे १२ ते १५ टक्के रुग्णांमध्ये औषधे प्रभावी ठरत नसून टीडीएम करण्याची आवश्यकता भासत आहे. परंतु टीडीएमची चाचणी सरकारी रुग्णालयांमध्ये फारशी उपलब्ध नाही. मुंबईत खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असून यासाठी सुमारे पाच हजार रुपये खर्च आहे. परिणामी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना ही चाचणी करणे शक्य होत नाही. चाचणीअभावी औषधे प्रभावी नसल्याने मग अनेकदा रुग्णांचा आजार वाढून औषधांना दाद न देणाऱ्या म्हणजेच ड्रग रेझिस्टंट (डीआर) टीबीपर्यत वाढतो आणि मग सहा महिन्यांऐवजी अधिक काळ औषधे घ्यावी लागतात, असे ही मुंबईतल्या डॉक्टरांनी मांडले आहे.
४० लहान बालकांमध्ये औषधे प्रभावहीन
केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर बालकांमध्येही डीएस टीबीची औषधे प्रभावहीन ठरत आहेत. पौगंडाअवस्थेतील काही बालकांमध्ये वजनानुसार डीएस टीबीची औषधे दिल्यानंतर विशेष सुधारणा दिसत नाही. आत्तापर्यत अशा अनेक बालकांमध्ये त्यांच्या वजनापेक्षा जास्तीची मात्रा देण्याची वेळ आली आहे, असे मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन रुग्णालयातील नॅशनल सेंटर फॉर एक्सिलन्स इन टीबी केंद्राच्या प्रमुख अधिकारी आणि संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख प्रमुख डॉ. इरा शाह यांनी सांगितले.
बालकांमध्ये नियोजित मात्रेच्या सुमारे १० ते १५ टक्क्क्यांनी औषधांची मात्रा वाढविली जाते. त्यानंतर बालकांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होत असल्याचे आढळत आहे. वाडियामध्ये आत्तापर्यत सुमारे ४० बालकांना त्यांच्या वजनापेक्षा जास्त मात्रेची औषधे द्यावी लागत असल्याचे ड़ॉ. शाह यांनी नोंदविले आहे.
पाच बालकांमध्ये एकदा मात्रा वाढवून फारशी सुधारणा दिसून न आल्याने दोन वेळेस मात्रा वाढवाव्या लागल्या आहेत. परंतु यातील दोन बालकांमध्ये अजूनही सुधारणा दिसत नसल्याने तिसऱ्यांदा मात्रा वाढविण्याची वेळ आली आहे, असे सांगताना डॉ. इरा शाह म्हणातात, अशा रितीने वजनाच्या तुलनेत औषधे प्रभावहीन ठरणे ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. आत्तापर्यत आम्हाला ड्रग रेझिस्टंट टीबी जास्त धोकादायक वाटत होता. कारण यामध्ये औषधांना आजार दाद देत नसल्याने विविध प्रकारच्या थेरपींचा वापर करावा लागतो. लहान मुलांमध्ये हे अधिकच क्लिष्ट आणि त्रासदायक असते. परंतु आता डीएस टीबीमध्ये अशा रितीने औषधे प्रभावहीन ठरत असतील तर रुग्णांवर उपचार करणे अधिक गुंतागुंतीचे होत आहे.
डीएस टीबीबाबत अधिक जागरुकता महत्त्वाची
रुग्णाला टीबीची औषधे सुरू केल्यानंतर दोन महिन्यांमध्ये फारशी प्रगती दिसत नाही असे दिसल्यानंतर लगेचच मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला पाठवावे. तेथे पुढील चाचण्या आणि उपचार योग्यरितीने केले जातील. अन्यथा रुग्ण बराच काळ टीबीची औषधे घेऊनही त्याचा आजारा आटोक्यात आणण्यावर विशेष परिणाम झाला नाही तर रुग्णाचा आजार पुढच्या टप्प्यात किंवा डीआरटीबी मध्ये जाऊ शकतो. अशा रुग्णांना मग सहा महिन्यांऐवजी अधिक काळ औषधे घ्यावी लागण्याची शक्यता आहे. डॉ. इरा शाह म्हणतात, स्थानिक डॉक्टरांनी विशेषत: लहान मुलांच्या बाबतीमध्ये टीबीचा आजार पहिल्या दोन महिन्यात आटोक्यात येत नसेल तर तातडीने मोठ्या रुग्णालयांमध्ये पाठविणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराची तीव्रता वाढू शकते.
टीडीएम चाचणीचा विस्तार आवश्यक
भारतीय राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत (एनटीईपी) टीडीएम तपासणीची सुविधा आयआरएलएस प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ही प्रगत तपासणी कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी आयआरएलएस मध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांसोबत तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करणेही गरजेचे आहे. हे टीबीच्या उपचारांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे रुग्णांच्या शरीरात टीबीविरोधी औषधांची योग्य पातळी आहे की नाही, हे तपासून उपचार अधिक अचूकपणे करता येतील.
जेजे रुग्णालयातील नॅशनल सेंटर फॉर एक्सिलन्स इन टीबी केंद्राचे प्रमुख अधिकारी आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशांत माने म्हणतात, बालकांमध्ये औषधे काम का करत नाहीत, याचा रीतसर अभ्यास होणे गरजेचे आहे. अनेकदा बालकांमध्ये आतड्याचे आजार किंवा अन्य काही कारणांमुळे ही स्थिती असते. त्यामुळे औषधांची मात्रा वाढविताना यामागची कारण मीमांसा शोधणे आवश्यक आहे. काही मुलांमध्ये तर औषधेच घेत नाहीत किंवा अर्धवट घेतात असंही आढळले आहे. जेजे रुग्णालयामध्ये सुमारे १६ बालकांमध्ये औषधांची मात्रा वाढविण्याची आवश्यकता भासली आहे, असे डॉ. माने सांगतात.
टीबीमध्ये अजूनतरी मोजकीच औषधे उपलब्ध आहेत. या क्षेत्रामध्ये संशोधन फारसे होत नसल्याने गेल्या अनेक दशकांमध्ये दोनच नवी औषधे आलेली आहेत. त्यातील बेडाक्युलीन या औषधालाही आता डीआरटीबी दाद देत नसल्याचे काही रुग्णांमध्ये दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये डीएस टीबीमधील औषधे काही रुग्णांमध्ये प्रभावहीन ठरत असली तर ही आगामी संकटाची चाहूल आहे. तेव्हा वेळीच सावध होऊन याबाबत अधिक खोलवर संशोधन आणि अभ्यास होणे गरजेचे आहे.