The prevalence of diabetes among young people is rising due to an irregular lifestyle
अतुल शिनगारे
धारुर : पूर्वी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारा मधुमेह आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे कमी वयातच रक्तातील साखर वाढण्याचे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना सुरुवातीला ठळक लक्षणे जाणवत नसल्याने तपासणीनंतर मधुमेहाचे निदान होते.
ऑनलाइन व कार्यालयीन कामामुळे तासन्तास बसून राहणे, वाहनांचा अधिक वापर आणि मैदानी खेळ व चालण्याचा अभाव यामुळे तरुणांची शारीरिक सक्रियता कमी झाली आहे. त्यातच फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोड पेये, बेकरी पदार्थ आणि अनियमित वेळेत जेवण्याच्या सवयी वाढल्या आहेत. त्यामुळे वजन वाढण्यासह मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
नोकरी, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे तरुणांमध्ये ताणतणाव वाढत आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल व संगणकाचा वापर केल्याने झोपेची वेळ व गुणवत्ता बिघडते. दीर्घकाळ अपुरी झोप आणि ताणतणावाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मधुमेहाची लक्षणे दुर्लक्षित करू नयेत वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, सतत भूक लागणे, वजन कमी होणे, थकवा, दृष्टी धूसर होणे, जखम उशिरा भरून येणे किंवा वारंवार संसर्ग होणे अशी लक्षणे काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात. मात्र अनेकांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे गरजेनुसार रक्तातील साखरेची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
आहारामध्ये गोड पदार्थ व साखरयुक्त पेयांचे सेवन मर्यादित करून आहारात भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, प्रथिने व तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. पुरेशी झोप घेणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे.
कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणे, वजन जास्त असणे, उच्च रक्तदाब किंवा अन्य जोखमीचे घटक असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करावी. गरजेनुसार उपाशीपोटी रक्तातील साखर, जेवणानंतरची साखर आणि एचबीएवनसी तपासणी केली जाते.