Mosquito Attraction Science : रात्री झोपताना कानापाशी होणारी भुनभुन आणि त्यानंतर मिळणारा 'कडकडून चावा'... डासांचा हा त्रास आपल्यापैकी प्रत्येकालाच रात्री झोपण्यापूर्वीचा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज युद्धपातळीवर मोहीम आखायला लावतो! मच्छरदाणी, मॉस्किटो कॉईल ते अगदी वेगवेगळ्या क्रीम्स... डासांना पळवून लावण्यासाठी आपण काय वाट्टेल ते करतो. पण तुम्ही कधी नोटीस केलंय का, डास काही विशिष्ट व्यक्तींकडेच अधिक आकर्षित का होतात आणि इतर जण त्यांच्यापासून कसे वाचतात? असं का होतं? संशोधकांच्या मते, शरीराचा विशिष्ट गंध, उष्णता, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि त्वचेची गुंतागुंतीची रासायनिक रचना कारणीभूत आहे. जाणून घ्या यामागचं सविस्तर विज्ञान...
शास्त्रज्ञांच्या मते, यामागे शरीराचा गंध, उष्णता, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन (श्वासावाटे बाहेर पडणारा वायू) आणि त्वचेची रासायनिक रचना यांचे एक गुंतागुंतीचे मिश्रण आहे. यामुळेच काही ठराविक लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात.
फ्रान्सच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट'मधील वैद्यकीय कीटकशास्त्रज्ञ फ्रेड्रिक सिगार्ड सांगतात की, डास नक्कीच काही लोकांकडे इतरांपेक्षा जास्त आकर्षित होतात; परंतु हे आकर्षण काळानुसार बदलू शकते. विशेष म्हणजे, केवळ मादी डास माणसांना चावतात. आपले पुढचे खाद्य शोधण्यासाठी त्या विविध प्रकारच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करतात.
स्वीडनचे संशोधक रिकाड इग्नेल यांच्या मते, डासांना आकर्षित करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे कार्बन डायऑक्साइड (CO 2 ). माणूस श्वासावाटे जो वायू बाहेर सोडतो, त्याचा सुगावा डास तब्बल १०० मीटर अंतरावरून लावू शकतात. एकदा का डास माणसाच्या जवळ आले, की मग ते शरीराचा गंध, तापमान आणि हवेतील दमटपणा यांच्या मदतीने आपले सर्वात आवडते लक्ष्य निवडतात.
रिकाड इग्नेल यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच 'एडिस इजिप्ती' (Aedes aegypti - डेंग्यू आणि पिवळा ताप पसरवणारे डास) या डासांच्या प्रजातीवर संशोधन करण्यात आले. ४२ महिलांवर केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असे दिसून आले की,त्यांच्या त्वचेतून काही विशिष्ट गंधयुक्त संयुगे जास्त प्रमाणात बाहेर पडतात, तिकडे डास जास्त आकर्षित होतात. ज्याला 'मशरूम अल्कोहोल' हे रसायन कारणीभूत असल्याचे आढळले. त्वचेवरील तेलाचे विघटन झाल्यावर हे रसायन तयार होते. याचे प्रमाण शरीरात थोडे जरी वाढले, तरी डास त्या व्यक्तीकडे लगेच खेचले जातात.
संशोधनातून समोर आलेली दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्कोहोलचे सेवन. अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, बिअर पिणाऱ्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात. अल्कोहोलमुळे शरीराचे तापमान वाढते, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते आणि त्वचेचा गंधही बदलतो, ज्यामुळे डास आकर्षित होतात. बुर्किना फासो येथील संशोधनानुसार मलेरिया पसरवणारे 'अॅनोफिलीस' डास पाणी पिणाऱ्यांपेक्षा बिअर पिणाऱ्या लोकांकडे जास्त आकर्षित झाले. तर नेदरलँड्समधील अभ्यासात बिअर प्यायलांकडे डास आकर्षित होण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांनी जास्त होते.
सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे की, ठराविक ब्लड ग्रुप (रक्तगट) असलेल्या लोकांना डास जास्त चावतात. मात्र, शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळला आहे. डासांचा आणि विशिष्ट रक्तगटाचा संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तसेच त्वचा, डोळे किंवा केसांचा रंग यामुळे डासांच्या चावण्यावर कोणताही फरक पडत नाही.
हवामान बदलामुळे (Climate Change) आता डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारखे आजार पसरवणाऱ्या डासांचा वावर नवीन भागातही वाढू लागला आहे. तापमान वाढल्यामुळे भविष्यात या आजारांचा धोका मोठ्या लोकसंख्येला होऊ शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
सैल कपडे वापरा: शरीर पूर्ण झाकणारे आणि सैल कपडे घाला.
मॉस्किटो रिपेलेंट: डासांना पळवून लावणारी क्रीम किंवा स्प्रे वापरा.
मच्छरदाणी: रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा: विशेषतः डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात अल्कोहोल टाळा.