

कावेरी गिरी
मुंबईतील एका कुटुंबातील चार सदस्यांचा कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाल्याची बातमी वार्यासारखी पसरली आणि साहजिकच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. उन्हाळ्याच्या लाहीलाहीत ‘अमृत’ ठरणारे हे फळ अचानक ‘विष’ कसे बनले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे; मात्र या घटनेच्या मुळाशी न जाता घाबरून जाणे चुकीचे ठरेल. विज्ञानाच्या नजरेतून या प्रकरणाचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, नैसर्गिकरीत्या पिकलेले कलिंगड कधीही जीवघेणे नसते; पण जेव्हा आपण ‘फूड पॉयझनिंग’बद्दल (अन्न विषबाधा) बोलतो, तेव्हा कलिंगड हे केवळ एक माध्यम असू शकते. त्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दलचा तपास सुरू आहे. दुसरीकडे आपण काही नित्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
*रासायनिक रंगांचा आणि इंजेक्शनचा वापर*
कलिंगड आतून लालभडक दिसावे, यासाठी काही विक्रेते ‘एरिथ्रोसिन’ (Erythrosine) किंवा ‘रोडामाईन बी’ (Rhodamine B) सारख्या घातक रंगांचे इंजेक्शन देतात. तसेच, फळ लवकर पिकवण्यासाठी ‘कार्बाईड’ किंवा ‘इथरल’चा वापर केला जातो. हे रसायने शरीरात गेल्यास मळमळ, उलट्या आणि तीव्र संसर्ग होऊ शकतो. या रसायनांचे प्रमाण खूप जास्त असेल, तर ते यकृत आणि मूत्रपिंडावर गंभीर परिणाम करू शकतात.
*साल्मोनेला आणि इतर जीवाणूंचा संसर्ग*
कलिंगड हे जमिनीवर वाढणारे फळ आहे. ते अस्वच्छ पाण्यात वाढवले गेले असेल किंवा कापताना अस्वच्छ सुरीचा वापर केला असेल, तर त्यावर ‘साल्मोनेला’ (सहसा अर्धवट शिजवलेले चिकन किंवा अंडी यांसारखे दूषित अन्न खाल्ल्याने लोकांना संसर्ग होतो. हे जीवाणू सामान्यतः पचनसंस्थेला संक्रमित करतात; परंतु ते रक्त प्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांनाही संक्रमित करू शकतात.) किंवा ‘ई-कोलाय’सारखे जीवाणू असू शकतात. कापलेले कलिंगड बराच वेळ उघड्यावर ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे ‘गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ (उल्टी, पोटात मुरडा मारणे, ताप, डायरिया) होऊन शरीरातील पाणी कमी होते (Dehydration), जे लहान मुले किंवा वृद्धांच्या बाबतीत जीवघेणे ठरू शकते.
* ‘नाईट्रेट’चे अतिप्रमाण*
शेतात पिकाची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून अनेकदा नायट्रोजनयुक्त खतांचा अतिवापर केला जातो. कलिंगडामध्ये हे नायट्रेटस् साठून राहतात. अशा कलिंगडाचे सेवन केल्यास रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होऊ शकते.
उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे; पण ते निवडताना आणि खाताना खालील नियमांचे पालन करा:
संपूर्ण फळ खरेदी करा : रस्त्यावर कापून ठेवलेले किंवा प्लास्टिक फिल्ममध्ये गुंडाळलेले कलिंगड कधीही घेऊ नका. उघड्यावरील फळांवर धूलिकण आणि जंतूंचा प्रादुर्भाव जास्त असतो.
धुवून मगच कापा : कलिंगड घरी आणल्यावर प्रथम ते स्वच्छ पाण्याने (शक्य असल्यास कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून) धुवून घ्या. यामुळे सालावर असलेली कीटकनाशके आणि माती निघून जाते.
रंगाची चाचणी करा : कलिंगड कापल्यावर जर त्याचा रंग हाताला लागत असेल किंवा पांढर्या कापडाने पुसल्यावर रंग कापडावर येत असेल, तर समजून जा की, त्यात कृत्रिम रंग आहे. असे कलिंगड खाऊ नका.
चव आणि वास : कलिंगडाला विचित्र वास येत असेल किंवा त्याची चव थोडी आंबट/कडू लागत असेल, तर ते खराब झाले आहे, असे समजावे.
साठवणूक : कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवताना ते हवाबंद डब्यात ठेवावे आणि 6-8 तासांच्या आत संपवावे.
*आयुर्वेद काय सांगतो?*
आयुर्वेदानुसार कलिंगड हे ‘थंड’ प्रवृत्तीचे फळ आहे. ते रात्रीच्या वेळी खाणे टाळावे. कारण, यामुळे कफ वाढू शकतो किंवा पचन बिघडू शकते. तसेच, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण, यामुळे पोटातील पाचक रसाचे प्रमाण बिघडून जुलाब होऊ शकतात.
*भीती नको, सतर्कता हवी!*
मुंबईतील घटना दुर्दैवी आहे; पण त्यावरून कलिंगड खायचे की नाही, या भीतीमागेच अनेक जण विचारात आहेत. आपण काय विकत घेतोय आणि ते किती स्वच्छ आहे, याकडे लक्ष देणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. ‘फूड सेफ्टी’ हा आपल्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा. फळे विकत घेताना विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच घ्या आणि शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे (FD-) तक्रार करा. लक्षात ठेवा, निसर्गाने दिलेली फळे आपली शत्रू नसतात; पण मानवाने त्यात केलेला हस्तक्षेप (रसायने, अस्वच्छता) त्यांना विषारी बनवू शकतो. त्यामुळे सावध राहा, सुरक्षित खा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या! कोणतीही खाद्यवस्तू खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना एकाच वेळी त्रास होत असेल, तर ते तीव्र स्वरूपाचे ‘अन्नबाधा’ लक्षण असते. अशावेळी घरगुती उपाय न करता तातडीने रुग्णालय गाठणे अनिवार्य आहे.
अखेर, कोणतेही अन्न सुरक्षित की असुरक्षित, हे त्या अन्नाच्या प्रकारावर नव्हे, तर त्याच्या हाताळणीवर आणि स्वच्छतेवर अवलंबून असते. त्यामुळे भीती न बाळगता जागरूकतेने आणि जबाबदारीने आहार घ्यावा, हीच खरी गरज आहे.