Cold Drink and Chips Pudhari
आरोग्य

Cold Drink and Chips: उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाणं किती धोकादायक? AIIMSच्या तज्ज्ञांनी दिला इशारा

Cold Drink And Chips Health Risk: AIIMS मधील तज्ज्ञांनी उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक आणि चिप्सचे कॉम्बिनेशन टाळण्याचा सल्ला दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Cold Drink And Chips Health Risk: उन्हाळा सुरू झाला की थंड पेयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. घरगुती कार्यक्रम असो किंवा मित्रमैत्रिणींसोबतची पार्टी, कोल्ड ड्रिंक आणि चिप्स हे कॉम्बिनेशन अनेकांचं आवडतं असतं. पण हेच कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असा इशारा All India Institute of Medical Sciences मधील प्रमुख आहारतज्ज्ञ डॉ. परमीत कौर यांनी दिला आहे.

देशातील अनेक भागांमध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. अशा परिस्थितीत शरीराला पाण्याची आणि इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. मात्र कोल्ड ड्रिंक आणि चिप्स एकत्र खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.

कोल्ड ड्रिंक शरीराला डिहायड्रेट करू शकतं

डॉ. परमीत कौर यांच्या मते, अनेकांना वाटतं की कोल्ड ड्रिंक प्यायल्याने तहान भागते. पण प्रत्यक्षात त्यामध्ये असलेली जास्त साखर आणि कॅफिन शरीरातील पाणी कमी करू शकतात.

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेशनची जास्त गरज असते. मात्र साखरयुक्त थंड पेय शरीरातील द्रव कमी करण्याचं काम करू शकतात. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

चिप्समुळे समस्या वाढते

चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि ट्रान्स फॅट असतं. जास्त मीठ खाल्ल्यामुळे तहान अधिक लागते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकतं. याशिवाय नियमितपणे चिप्स खाल्ल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

उष्माघाताचा धोका वाढू शकतो

उन्हाळ्यात आधीच शरीरातून घामाद्वारे पाणी बाहेर पडत असतं. अशावेळी चुकीचा आहार घेतल्यास उष्माघात, अशक्तपणा, चक्कर येणे आणि थकवा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांनी अशा पदार्थांपासून सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मग काय खावं?

तज्ज्ञांच्या मते, कोल्ड ड्रिंकऐवजी नारळपाणी, लिंबूपाणी किंवा घरगुती ओआरएस पिणं अधिक फायदेशीर आहे. घरच्या घरी ओआरएस तयार करण्यासाठी एका लिटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून ते दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पिण्याचा सल्ला त्यांनी दिला.

चिप्सऐवजी भाजलेले मखाणे, फळं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी अधिक चांगलं मानलं जातं. उन्हाळ्यात टरबूज, खरबूज यांसारखी हंगामी फळं शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT