

Raja Shivaji Advance Booking: मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’. रितेश देशमुख दिग्दर्शित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होत असून रिलीजपूर्वीच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली आहे.
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत मराठी आणि हिंदीसह 60 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. विशेषतः महाराष्ट्रात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हा चित्रपट असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत भावनिक नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
रिपोर्टनुसार, मराठीसह तब्बल 58 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. तर हिंदीतही हजारो तिकिटं विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्ससह चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.
चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता पहिल्याच दिवशी मोठी ओपनिंग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय 1 मेच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून केला जात आहे.
या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त अफझल खानच्या भूमिकेत दिसणार आहेत.
याशिवाय अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जेनेलिया डिसूझा आणि जितेंद्र जोशी यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटात सलमान खानचा विशेष कॅमिओ असल्याचीही चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, तो जिवा महालाची भूमिका साकारणार आहेत. अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक लढाईच्या प्रसंगात त्याची झलक पाहायला मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर ‘एक दिन’ या चित्रपटासोबत सामना होणार आहे. या चित्रपटात जुनैद खान आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. मात्र सध्या तरी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास घडवू शकतो, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे.