शरीरासाठी अत्यावश्यक असलेलं व्हिटॅमिन B12 डीएनए निर्मिती, उर्जा निर्मिती आणि मेंदू व मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. मात्र, 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे 20% लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता दिसून येते. भारतातही ही समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
व्हिटॅमिन B12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व असून ते नैसर्गिकरित्या मासे, अंडी, दूध, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी अन्नात हे व्हिटॅमिन फारच कमी प्रमाणात असते, त्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांमध्ये B12 ची कमतरता अधिक प्रमाणात दिसते.
व्हिटॅमिन B12 ला ‘कोबालामिन्स’ असंही म्हणतात कारण त्यात कोबाल्ट हे खनिज असतं. शरीर स्वतः B12 तयार करू शकत नाही, त्यामुळे ते अन्न किंवा सप्लिमेंट्समधून मिळवणं गरजेचं आहे.
रक्त तयार करणे – आरोग्यदायी लाल रक्तपेशी तयार करण्यात मदत करते.
DNA निर्मिती – पेशींमधील DNA ची निर्मिती आणि देखभाल करते.
मज्जासंस्थेचं आरोग्य – मज्जा पेशींचं कार्य सुरळीत ठेवते.
उर्जा निर्मिती – कार्बोहायड्रेटचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करून शरीराला ऊर्जा देते.
मेंदूचं आरोग्य – लक्ष, स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक.
हृदयाचं आरोग्य – होमोसिस्टीनचं प्रमाण नियंत्रणात ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करते.
मूड नियंत्रित करणे – सेरोटोनिन, डोपामिनसारखे मूड रेग्युलेट करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करते.
हाडांची मजबुती – हाडं मजबूत ठेवण्यास मदत करते.
त्वचा, केस व नखांची काळजी – पेशींच्या पुनरुत्पादनामुळे त्वचा व केस निरोगी राहतात.
प्रतिकारशक्ती – पांढऱ्या रक्तपेशी निर्माण करून इम्युनिटी वाढवते.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता हळूहळू विकसित होते, पण वेळीच लक्ष न दिल्यास ती गंभीर होऊ शकते. खाली दिलेली लक्षणं आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सततचा थकवा व अशक्तपणा
त्वचा फिकट दिसणे
वारंवार डोकेदुखी
चिडचिड, नैराश्य, मूड स्विंग्स
जीभ लालसर व जळजळ होणं (Glossitis)
हात-पायात सुन्नपणा
समतोल बिघडणं किंवा चालताना अडखळणे
लक्ष कमी लागणे व स्मरणशक्ती कमजोर होणे
अन्नातून योग्य प्रमाणात B12 न मिळणे (विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये)
Pernicious Anemia – शरीरात 'Intrinsic Factor' कमी होणं
पचनसंस्थेतील सर्जरी किंवा समस्या (जसे की Crohn's Disease)
काही दीर्घकालीन औषधांचा वापर
वृद्धावस्था – वय जसे वाढतं, B12 शोषण कमी होतं