

‘नेमेचि येतो मग पावसाळा’, या धर्तीवर गेल्या काही दिवसांपासून कोव्हिडच्या जे.एन.1 आणि त्याचे उपप्रकार एन.बी.1.8.1 आणि एल.एफ. 7 यांच्यामुळे बाधित झालेल्या कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत आहे. ‘कोव्हिड 19’ चा उदय झाल्यापासून जगभरात जवळपास 70 लाख व्यक्ती दगावल्या आहेत. भारताचा विचार करता, आज पर्यंत 5,35,666 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. कोव्हिडचे नवीन व्हेरियंट पूर्वीइतके घातक नसले, तरी त्यामुळे काळजीत भर पडणे स्वाभाविक आहे.
कोव्हिडमुळे आतापर्यंत कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व रुग्णांना आधीपासूनचे कोणते ना कोणते आजार होते. याशिवाय केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीसह एकूण 20 राज्यांत कोव्हिडचे रुग्ण आढळून आले आहेत. कोव्हिडचे नवीन व्हेरियंट पूर्वीइतके घातक नसले, तरी ते पसरण्याचा वेग मात्र खूप जास्त आहे.
जे एन.1, एन.बी.1.8.1 आणि एल.एफ.7 या व्हेरियंटमुळे हाँगकाँग, सिंगापूर,चीन आणि थायलंडमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. हाँगकाँगमध्ये 30 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसांत 12 ते 14 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. कोव्हिडचे हे व्हेरियंट जरी तितकेसे धोकादायक नसले तरी, जागतिक आरोग्य संघटना जगभरातील आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत.
पाच वर्षांखालील मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीपासून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, सी.ओ.पी.डी. किंवा इतर श्वसनविकार, दीर्घकालीन यकृतविकार, मूत्रपिंड विकार, कर्करोग यांसारखे आजार आहेत, ज्यांना दीर्घकालीन आजारासाठी इम्युनोसप्रेसंट प्रकारची औषधे सुरू आहेत, ज्या व्यक्ती धूम्रपान करतात, त्या सर्वांनी अधिक दक्ष राहायला हवे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नुकतेच प्रवासाला जाऊन आलेले आहेत. उदा. सिंगापूर, हाँगकाँग, चीन , थायलंड इ. त्यांनी सतर्क राहायला हवे.
कोव्हिड रुग्णांमध्ये बारीक ताप, घशात दुखणे, कोरडा खोकला, कणकण, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, नाक गळणे, नाक बंद होणे अशी लक्षणे हल्ली दिसून येत आहेत. जे. एन.1 या व्हेरियंटसाठी पॅक्सलॉविड नावाचे अँटिव्हायरस औषध उपयुक्त ठरते. रेमडेसिव्हीर आणि मोल्नपिराविर ही औषधेही उपयुक्त ठरतात.
कोव्हिडवर मात करण्यासाठी, भारतातील आरोग्य यंत्रणेने आपली तयारी केलेली आहे. कोव्हिडची शक्यता असलेल्या रुग्णांमध्ये जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणी करावी लागेल. कोव्हिडसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. आवश्यक त्या रुग्णांसाठी हॉस्पिटल मधील बेड, ऑक्सिजन आणि औषधे उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले जात आहेत. आयसोलेशन वॉर्ड पुन्हा सुरू करावे लागतील. कोव्हिड होऊ नये किंवा पसरू नये यासाठी सर्वांनी स्वच्छता राखायला हवी. गर्दीच्या ठिकाणी एन-95 मास्क वापरायला हवेत आणि वर नमूद केलेली लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
सध्याचे व्हेरियंट सौम्य असून, रुग्ण घरीच बरे होत आहेत. लक्षणे तीव्र आढळली, तरच हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. त्यामुळे घाबरून जायचे मुळीच कारण नाही. सध्याच्या नवीन व्हेरियंट्समुळे भारतात सौम्य वाढ दिसत असली, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल डिस्टंसिंग , हात स्वच्छ धुणे आणि एन -95 मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करून सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणजे काळजी करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
जे. एन.1 - हा सध्या भारतात सर्वाधिक आढळणारा व्हेरियंट आहे. हा जवळपास 53% चाचण्यांमध्ये आढळतो. ओमायक्रोन बी.ए.2.86 चा हा उपप्रकार असून, त्याची संसर्ग क्षमता खूप जास्त आहे; पण तो सौम्य आजार निर्माण करतो. एल.4.5.5.एस. स्पाईक प्रोटिन हा मनुष्यासाठी घातक आहे. कारण, तो माणसाच्या पेशींवर हल्ला करतो. एक्स.बी.बी.1.5 या व्हेरियंटपेक्षा जवळपास दीडपट अधिक वेगाने पसरतो. आणि बी.ए.2.86 या व्हेरियंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. भारतातील सध्याचा व्हेरियंट हा जे.एन.1 हा आहे.
एन.बी.1.8.1 - हा तामिळनाडूत एप्रिल 2025 मध्ये आढळला. जे.एन.1 चा हा उपप्रकार असून, त्याची मानवी पेशींना चिकटण्याची क्षमता वाढली आहे.
एल.एफ.7 - गुजरातमध्ये याचे मे 2025 मध्ये चार रुग्ण सापडले. हा देखील जे.एन.1 चाच एक उपप्रकार आहे.