डॉ. संतोष काळे
सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज, रील्स आणि पोस्टस्मध्ये मधुमेह पूर्णपणे बरा होतो, असे दावे केले जातात. अनेक वेळा ही माहिती अतिरंजित किंवा चुकीचीही असते; मात्र काही माहिती योग्य असून ती वैद्यकीय संशोधनावर आधारितही असते.
टाईप-2 मधुमेह रिव्हर्स किंवा रिमिशनमध्ये नेला जाऊ शकतो. म्हणजेच रुग्णाची रक्तातील साखर पातळी औषधांशिवाय सामान्य पातळीवर ठेवली जाऊ शकते. पण यात एक महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे ही स्थिती कायमची नाही. रुग्णाने आपले आहार, वजन आणि जीवनशैली यामध्ये कठोर व सातत्यपूर्ण बदल केल्यासच ही स्थिती राखली जाऊ शकते, अन्यथा पुन्हा साखर वाढू शकते.
शरीराचे वजन कमी करणे - विशेषतः जर रुग्णाचे वजन वाढलेले असेल, तर 10-15 टक्के वजन घटल्यास मधुमेहावर प्रभावी नियंत्रण शक्य आहे.
मधुमेहासाठी खास आहार योजना पाळणे. कमी कॅलरीचा, कमी साखर असलेला किंवा साखरमुक्त आहाराचे सेवन करणे
- नियमितपणे चालणे, पोहणे, सायकलिंग, योगासारखे व्यायाम करणे
- इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी कमी कार्बोहायड्रेट, फायबरयुक्त आहार घेणे.
यावर जगभरातील संशोधन सुरू आहे. ब्रिटनमधील डायरेक्ट ट्रायलचे निष्कर्ष जागतिक स्तरावर एक नवीन द़ृष्टिकोन घेऊन आले.
डायरेक्ट म्हणजेच डायबेटीस रिमिशन क्लिनिकल ट्रायल हा एक ब्रिटनमधील न्यूकॅसल आणि ग्लासगो विद्यापीठांनी संयुक्तपणे राबवलेला मोठा वैज्ञानिक अभ्यास होता. या ट्रायलचा मुख्य उद्देश असा होता की, आहार व वजन कमी करून टाईप-2 मधुमेह रुग्णांमध्ये औषधांशिवाय रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते का? ही संकल्पना त्यावेळेस क्रांतिकारी होती. पारंपरिक वैद्यकीय द़ृष्टिकोनानुसार मधुमेह एक आजीवन रोग मानला जात होता. मात्र डायरेक्ट ट्रायलने ही समजूत बदलविण्यास सुरुवात केली. या ट्रायलमध्ये सुमारे 300 रुग्णांचा सहभाग होता. त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले. एक गट ‘इंटर्व्हेन्शन ग्रुप’ म्हणजेच ज्यांना विशेष उपचार व आहार योजना देण्यात आली होती. तर दुसरा गट ‘नियंत्रण गट’ होता, ज्यांना पारंपरिक औषधोपचार सुरू ठेवण्यात आले होते.
कमी कॅलरीचा आहार : 12-20 आठवडे फक्त 850 कॅलरी प्रतिदिन पोटात जातील अशा स्वरुपाचा द्रव स्वरूपातील (सूप/शेक्स) आहार देणे. यानंतर 2 ते 8 आठवडे हळूहळू नेहमीचा आहार पुन्हा सुरू करणे आणि मुख्य म्हणजे सातत्याने वजन नियंत्रणासाठी सल्ला घेत राहणे यांचा अंतर्भाव होता. महत्त्वाची बाब म्हणजे या गटातील रुग्णांना कुठलाही औषधोपचार दिला गेला नाही, केवळ आहार व जीवनशैलीवर लक्ष केंद्रित केले गेले. याचे निष्कर्ष खूप आशादायक होते. 12 महिन्यांमध्ये 46 टक्के रुग्ण पूर्णतः रिमिशनमध्ये गेले म्हणजेच त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण औषधांशिवायही सामान्य पातळीवर होते. जे रुग्ण 10 किलोहून अधिक वजन कमी करू शकले, त्यांच्यात 70 टक्क्यांहून अधिक रिमिशनचे प्रमाण आढळले. 2 वर्षांनंतरही 36 टक्के रुग्ण रिमिशनमध्ये कायम राहिले. जेव्हा चरबी यकृत आणि पॅन्क्रीयाजमध्ये साचते, तेव्हा ती बीटा पेशींचे कार्य रोखते आणि मधुमेह होतो, पण जेव्हा वजन कमी होते, शरीरातील चरबी वितळते, तेव्हा बीटा पेशींचे कार्य पुन्हा सुरू होते. हीच खरी रिमिशनची गुरुकिल्ली आहे.
टाईप-2 मधुमेह औषधोपचारांविना बरा होऊ शकतो, पण यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन, ब्लड शुगर मॉनिटरिंग, आहाराबाबतचा प्रचंड काटेकोरपणा आवश्यक आहे.