Summer food safety tips
उन्हाळ्याच्या दिवसांत बनवलेले अन्न लवकर खराब होते. अशा परिस्थितीत सर्वाधिक अडचण त्या लोकांना होते जे टिफिनमध्ये अन्न भरून ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी नेतात. त्यामुळे हे जाणून घेणे आवश्यक आहे की, टिफिनमध्ये भरलेले अन्न खराब होण्यापासून कसे वाचवता येईल. त्याचबरोबर उन्हाळ्यात किती वेळात अन्न खराब होते आणि अन्न बनवून किती वेळात ते खाणे योग्य असते, हेदेखील महत्त्वाचे आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानुसार उन्हाळ्यात बनवलेले (मग ते शिजवलेले असले तरी) ताजे अन्न सामान्यतः फक्त दोन तासांपर्यंतच ताजं राहतं.
रूम टेम्परेचरवर (साधारण ३०-३२ डिग्री सेल्सियस) ठेवलेल्या तयार अन्नामध्ये साधारणतः दोन तासांनी अन्न खराब करणारे बॅक्टेरिया झपाट्याने वाढू लागतात.
म्हणून कोणताही पदार्थ बनवल्यानंतर दोन तासांच्या आत खाणे योग्य ठरते; परंतु हे प्रत्येक वेळी शक्यच असेल असे नाही. अशा वेळी अन्न दोन तासांनंतर फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे आहे; पण जे लोक नोकरदार-व्यावसायिक आहेत त्यांना टिफिनमधून अन्नपदार्थ सोबत न्यावे लागतात. त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे...
खोलीचे तापमान ३२ डिग्री सेल्सिअसपेक्षा (९० फॅरेनहाईट) जास्त असेल, तर असे अन्न फक्त एक तास ठेवणे सुरक्षित असते. कारण, त्यानंतर अन्न डेंजर झोनमध्ये जातं. म्हणजे बॅक्टेरिया फार जलद गतीने वाढू लागतात. म्हणून जिथे शक्य असेल तिथे थंड वातावरणात अन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
* हॉट बॉक्स प्रकारच्या टिफिनमध्ये अन्न भरावे. हे टिफिन अन्न गरम ठेवतात आणि बाहेरील उष्णतेपासून त्याचं रक्षण करतात.
* ऑफिसमध्ये पोहोचल्यावर शक्य असेल, तर अन्न गारवा असेल अशा ठिकाणी किंवा सरळ फ्रिजमध्ये ठेवावे. त्यामुळे अन्न अधिक काळ ताजं राहतं. फ्रिजची सोय नसेल, तर एसी असलेल्या खोलीत अन्न ठेवा. थंड तापमानामुळे अन्न लवकर खराब होत नाही.
* नेहमी ताजं अन्नच टिफिनमध्ये घालावे. आदल्या दिवशीचं उरलेलं किंवा रात्रभर ठेवलेलं अन्न टिफिनमधून नेणे टाळावे.
* अन्नात आंबट पदार्थ टाळावेत. कारण, आंबट किंवा कडवट पदार्थ उन्हाळ्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढवतात.
* टिफिनमध्ये अन्न भरताना ते पूर्णपणे थंड झालं आहे याची खात्री करावी. कारण, गरम अन्न थेट टिफिनमध्ये भरल्यास त्यात बॅक्टेरिया लवकर वाढतात.
* शक्य असेल, तर अन्न खाण्यापूर्वी ते गरम करून खावे. यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात आणि अन्न पुन्हा सुरक्षित होतं.