Social Media Likes and Depression : सोशल मीडियावर एखादी पोस्ट केल्यानंतर अनेक जण सर्वप्रथम त्या पोस्टला किती 'लाइक्स' मिळाले आणि ती पोस्ट कोणी 'लाइक' केली, हे पाहतात. एखादी पोस्ट लोकप्रिय ठरल्यास हा अनुभव क्षणार्धात मूड सुधारू शकतो, हे यापूर्वीच्या अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे. आता नवीन संशोधनात नैराश्यग्रस्त व्यक्तींवर सोशल मीडियावरील 'लाइक्स'चा कसा परिणाम होतो यावर भाष्य करण्यात आले आहे.
'JAMA Psychiatry' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार, नैराश्याचा (डिप्रेशन) सामना करणाऱ्या व्यक्तींमध्ये 'लाइक्स' मिळाल्यानंतर अधिक तीव्र वर्तनात्मक प्रतिसाद दिसून येतो. संशोधकांना आढळले की, एखाद्या दिवशी त्यांच्या पोस्टला जितके अधिक 'लाइक्स' मिळत होते, तितकीच पुढील दिवशी त्यांनी पुन्हा पोस्ट करण्याची शक्यता वाढत होती. हा निष्कर्ष याआधीच्या काही संशोधनांच्या विरोधात आहे. त्या संशोधनांमध्ये नैराश्यग्रस्त व्यक्ती सकारात्मक प्रतिसादाला तुलनेने कमी प्रतिक्रिया देतात, असे म्हटले होते.
प्रिन्स्टन विद्यापीठातील डॉ. डॅन-मिर्सिया मिरेया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्विटरच्या तीन स्वतंत्र डेटासेटमधील 7,736 वापरकर्त्यांच्या 1.7 कोटींहून अधिक पोस्टचे विश्लेषण केले. संशोधकांनी प्रत्येक वापरकर्त्याच्या दैनंदिन सोशल मीडिया वापराचा मागोवा घेतला आणि एका दिवशी प्रत्येक पोस्टला मिळालेल्या सरासरी 'लाइक्स'ची तुलना पुढील दिवशी त्यांनी केलेल्या पोस्टच्या संख्येशी केली.
पहिल्या गटात अशा वापरकर्त्यांचा समावेश होता, ज्यांनी आपल्या ट्विट्समध्ये स्वतःला नैराश्याचे निदान झाल्याचे नमूद केले होते. दुसऱ्या गटातील वापरकर्त्यांची निवड ऑनलाइन जाहिरातींद्वारे करण्यात आली होती. त्यांना मागील चार आठवड्यांत किती वेळा नैराश्य जाणवले, याबाबत पाच-बिंदूंच्या मापनश्रेणीवर प्रश्न विचारण्यात आले. तिसऱ्या गटाने नैराश्याची लक्षणे ओळखण्यासाठी मान्यताप्राप्त प्रश्नावली भरली होती.नैराश्याचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करणाऱ्या तिन्ही डेटासेटमध्ये सारखेच निष्कर्ष मिळाल्याने या संशोधनावरील विश्वासार्हता अधिक मजबूत झाली.
संशोधनात स्पष्ट झाले की, तिन्ही गटांमध्ये नैराश्य किंवा नैराश्याची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी इतर वापरकर्त्यांच्या तुलनेत 'लाइक्स' मिळाल्यानंतर सातत्याने अधिक तीव्र प्रतिसाद दिला. संशोधकांनी आपल्या संशोधनपत्रात म्हटले आहे, "या अभ्यासात आम्हाला असे आढळले की, नैराश्याशी संबंधित मानसिक लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये ट्विटरवरील 'लाइक्स'मुळे अधिक प्रोत्साहन मिळण्याची प्रवृत्ती दिसून आली."
संशोधन पथकाच्या मते, हा परिणाम अँक्शस-डिप्रेशन (Anxious Depression) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्षणांच्या विशिष्ट स्वरूपाशी संबंधित असू शकतो. या स्थितीत नैराश्य, चिंता आणि उदासीनतेची भावना एकत्र दिसून येते. अशा मिश्र लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये 'लाइक्स' मिळाल्यानंतर भविष्यात अधिक पोस्ट करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचेही संशोधनात आढळले.
संशोधकांनी इतर काही मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षणांचाही अभ्यास केला. त्यात कम्पल्सिव्हिटी आणि इंट्रुसिव्ह थॉट्स यांचा समावेश होता. मात्र, या लक्षणांचा 'लाइक्स'मधून मिळणाऱ्या अतिरिक्त प्रोत्साहनाशी थेट संबंध आढळला नाही. उलट, या लक्षणांचे प्रमाण अधिक असलेल्या व्यक्ती मिळणाऱ्या प्रतिसादाची पर्वा न करता नियमितपणे अधिक पोस्ट करत असल्याचे दिसून आले.
संशोधकांना या अभ्यासात दिसून आलेला परिणाम तुलनेने मर्यादित स्वरूपाचा होता. तसेच, हा अभ्यास एका विशिष्ट कालावधीतील निरीक्षणांवर आधारित असल्याने नैराश्यामुळे 'लाइक्स'ना अधिक प्रतिसाद मिळतो की 'लाइक्स'मुळे नैराश्यावर परिणाम होतो, हे निश्चितपणे सांगता येत नाही.तरीही, प्रयोगशाळेबाहेर प्रत्यक्ष सोशल मीडिया वापराच्या आधारे या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या सुरुवातीच्या संशोधनांपैकी हा एक महत्त्वाचा अभ्यास मानला जातो.संशोधकांनी शेवटी नमूद केले आहे, "आमचे निष्कर्ष संगणकीय मानसोपचारशास्त्र क्षेत्रात प्रत्यक्ष जीवनातील वर्तनाचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. तसेच, सोशल मीडियाचा वापर आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंध स्पष्ट करणाऱ्या संभाव्य मानसशास्त्रीय यंत्रणांवरही प्रकाश टाकतात."