Short Video Brain Effect AI-generated image
आरोग्य

Short Video Brain Effect : मोबाईल स्क्रोलिंग करताना मेंदूत नेमकं काय घडतं? नवीन संशोधनात मिळालं उत्तर

मेंदूतील शरीरावर नियंत्रण करणाऱ्या भागांची हालचाल मोठ्या प्रमाणावर मंदावते

पुढारी वृत्तसेवा

Short Video Brain Effect : स्‍मार्ट फोन आपल्या जगण्यात आला आणि काही वर्षांमध्‍ये जगण्याचे सारे मापदंडच बदलले. अवघ्या काही वर्षांमध्ये त्याने आपलं जगणं इतकं व्यापलं आहे की, आता त्याच्याशिवाय राहण्याचा विचारही असह्य करतो. तसेच मोबाईल स्क्रोलिंग करत राहणे ही सवयच आता एका गंभीर मानसिक आणि शारीरिक व्यसनामध्ये रूपांतरित झाली आहे. या डिजिटल जाळ्यात अडकलेल्या आपल्या मेंदूवर नेमका कसा आणि किती खोल परिणाम होतोय, हे अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. आता नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनाने मेंदूतील या न दिसणाऱ्या बदलांमागचं सत्य उघड केलं असून, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

FMRI आणि H-MRS स्कॅनवर आधारित संशोधन

टिकटॉक, इंस्टाग्राम किंवा युट्यूबवर रील आणि शॉर्ट व्हिडिओ पाहताना माणसाचा मेंदू नेमका कसा प्रतिसाद देतो, याचं उत्तर एका नव्या संशोधनातून मिळालं आहे. सतत शॉर्ट व्हिडिओ पाहिल्याने मेंदूतील स्वयं-नियंत्रण (Self-regulation) आणि विचार प्रक्रियेचे नियंत्रण करणारे भाग कमजोर किंवा निष्क्रिय होतात, असं या अभ्यासात आढळलं आहे. चीनमधील झेजियांग विद्यापीठातील संशोधक युझेंग हू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं असून, त्याचे निष्कर्ष 'न्यूरोइमेज' (NeuroImage) या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. हे संशोधन तरुणांच्याFMRI आणि H-MRS स्कॅनवर आधारित असून, डिजिटल मीडिया माणसाच्या मेंदूतील नियंत्रण यंत्रणा आणि आनंदाची अनुभूती देणारी यंत्रणा यांमधील संतुलन कसे बिघडवतो, हे या संशोधनाने अधोरेखित केले आहे.

मोबाईल स्क्रोलिंग करताना मेंदूत नेमकं काय घडतं?

तुम्‍ही जेव्हा आवडीचे शॉर्ट व्हिडिओ पूर्ण पाहता, तेव्हा मेंदूतील डॉर्सल अँटिरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स (dACC) आणि डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (dlPFC) या मेंदूतील विचार करण्याची व एकूणच शरीरावर नियंत्रण करणाऱ्या (कॉग्निटिव्ह कंट्रोल) भागांची हालचाल मोठ्या प्रमाणावर मंदावते.

व्हिडिओ स्कीप केल्यास काय होतं?

संशोधनात असे आढळले की, मोबाईल फोन स्क्रोलिंग करताना आवडीचे व्हिडिओ नसतात तेव्हा युजर लगेच ते व्हिडिओ स्कीप करतात. त्यावेळी मेंदूवर असा कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही.

स्क्रोलिंगचे व्यसनात कसे रूपांतर होते?

मोबाईल फोन स्क्रोलिंगचे व्यसनात रूपांतर होण्यास मेंदूतील 'ग्लुटामेट' रसायनाचे प्रमाण कारणीभूत ठरते. मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ग्लुटामेटचा वापर करतात. नवीन माहिती शिकणे, ती लक्षात ठेवणे आणि आठवणे यामध्ये ग्लुटामेटची महत्त्वाची भूमिका असते.ज्यांच्या मेंदूत ग्लुटामेटची पातळी जास्त असते, त्यांच्या मेंदूचे नियंत्रण सहजासहजी सुटत नाही. तर ग्लुटामेटची पातळी कमी असलेल्या लोकांना स्क्रोलिंग थांबवणे कठीण जाते.

मेंदू स्वयंचलित मोडमध्ये जातो

संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, स्क्रोलिंग करताना एखादा कंटेंट अत्यंत रंजक किंवा आकर्षक असतो, तेव्हा मेंदूची देखरेख प्रणाली शिथिल होते. त्यामुळे माणूस मेंदूच्या स्वयंचलित मोडमध्ये जातो. एकदा का मेंदू स्वयंचलित मोडमध्ये गेला की, युजर नकळतपणे तासन्‌तास स्क्रोल करत राहतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT