Weight loss tips 21 days 
आरोग्य

Weight loss tips 21 days: व्यायाम नाही, जिम नाही! अभिनेता आर. माधवनचा २१ दिवसांचा फिटनेस मंत्र काय?

R Madhavan fitness secret: अभिनेता आर. माधवन सध्या ५५ वर्षांचे असून, ते त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि आरोग्याकडेही विशेष लक्ष देतात.

मोनिका क्षीरसागर

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या बहुमुखी आणि आकर्षक भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आर. माधवन आजही तितकेच लोकप्रिय आहेत. 'रहना है तेरे दिल में' पासून 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' पर्यंतचा त्याचा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला आहे.

अभिनेता आर. माधवन सध्या ५५ वर्षांचे असून, ते त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि आरोग्याकडेही विशेष लक्ष देतात. त्यांचे अलीकडचे वजन कमी करण्याचे रहस्य चर्चेत आहे, कारण हे कोणत्याही कठीण व्यायामाशिवाय, क्रॅश डाएटशिवाय किंवा जिममध्ये न जाता साधले आहे. ही परिवर्तन प्रक्रिया खूप साधी, शिस्तबद्ध आणि सजग जीवनशैलीवर आधारित आहे.

माधवनचा २१ दिवसांचा फिटनेस मंत्र काय?

'रॉकेट्री' चित्रपटानंतर माधवन यांनी आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले. त्यांनी एका संवादात सांगितले की, या बदलांमुळे त्यांना फक्त तीन आठवड्यांत वजन कमी करण्यात मदत झाली. हे बदल बारीक असले तरी सातत्यपूर्ण होते. त्यांनी काय खाल्ले यापेक्षा कधी आणि कसे खाल्ले यावर अधिक लक्ष केंद्रित केले.

१. इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting)

माधवन यांनी जेवण करण्याची एक शिस्तबद्ध वेळ निश्चित केली. ते संध्याकाळी ६:४५ नंतर कोणताही आहार घेत नव्हते. या प्रकारच्या इंटरमिटंट फास्टिंगमुळे (ठराविक वेळेत उपवास) त्यांच्या शरीराला रात्री आराम मिळाला, पचन क्रिया सुधारली आणि चयापचय (metabolism) वेगाने झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली.

२. हळू आणि भरपूर चावणे (Heavy Chewing)

या दिनचर्येतील एक खास गोष्ट म्हणजे प्रत्येक घास ४५ ते ६० वेळा चावणे. 'तुमचं अन्न प्या आणि पाणी चावा' या तत्त्वावर त्यांनी विश्वास ठेवला. यामुळे पचन सुधारले, जास्त खाणे आपोआप थांबले आणि पोट भरल्याचा संदेश त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यास पुरेसा वेळ मिळाला.

३. योग्य आहाराची निवड (Smart Food Choices)

दुपारी ३ वाजल्यानंतर माधवन यांनी कोणताही कच्चा (Raw) पदार्थ खाणे पूर्णपणे टाळले. त्यांचे जेवण साधे, शिजवलेले आणि हिरव्या भाज्यांनी समृद्ध असे. त्यांनी प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ टाळून घरगुती आणि स्वच्छ आहारावर भर दिला.

४. जीवनशैलीतील चांगल्या सवयी (Lifestyle Habits)

व्यायाम न करता सकाळी लवकर लांबच्या मॉर्निंग वॉकला जाणे. लवकर झोपणे आणि गाढ विश्रांती (Deep Rest) घेणे. झोपण्यापूर्वी किमान ९० मिनिटे स्क्रीन टाइम (मोबाइल/टीव्ही) कमी करणे. दिवसभर पुरेसे पाणी पिऊन शरीराला हायड्रेटेड ठेवणे. आतड्यांच्या आरोग्याच्या (Gut Health) तज्ज्ञांनुसार, हे बदल प्रभावी ठरतात कारण अन्न व्यवस्थित चावल्याने पचन सुधारते, हळू खाल्ल्याने अन्न सेवन नियंत्रित होते आणि उपवासामुळे चरबी बर्न होण्यास मदत होते.

महत्त्वाचे मुद्दे (Story Highlights)

अभिनेते आर. माधवन यांनी व्यायाम, सप्लिमेंट्स किंवा सर्जरीशिवाय वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला. त्यांनी सायंकाळी ६:४५ पर्यंत शेवटचे जेवण, ३ वाजेनंतर कच्चे अन्न खाणे टाळले. 'सजगपणे चावणे' (४५ ते ६० वेळा) यावर विशेष भर दिला, ज्यामुळे पचन सुधारले आणि नैसर्गिकरित्या भूक नियंत्रित झाली. सकाळचा वॉक, पुरेसे पाणी, लवकर आणि स्क्रीन-मुक्त झोप, तसेच घरगुती, स्वच्छ आहाराची निवड अशी त्यांची दैनंदिनी त्यांनी नियंत्रित आणि सातत्यपूर्ण ठेवल्याने हे शक्य झाले. माधवनचा २१ दिवसांचा प्रवास आपल्याला हे शिकवतो की, शरीर सुडौल बनवण्यासाठी नेहमीच कठोर उपायांची गरज नसते. कधी खावे, कसे खावे आणि काय खावे या शरीराच्या नैसर्गिक तालावर लक्ष केंद्रित करूनही आश्चर्यकारक परिणाम साधता येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT