

भाज्या खाणे आरोग्यासाठी किती चांगले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भाज्यांमधून शरीराला अनेक प्रकारचे पोषण मिळते; पण तुम्हाला हे माहीत आहे का की, काही भाज्या चरबी (Fat) जाळण्यासाठीदेखील मदत करू शकतात? वजन कमी करण्यासाठी आपण सहसा महागडे सुपरफूडस्, सप्लिमेंटस् किंवा खास डाएट प्लॅन फॉलो करतो. मात्र, आपल्या रोजच्या आहारातल्या काही भाज्या चयापचय क्रिया गतिमान करतात, पचन सुधारतात आणि नैसर्गिकरीत्या शरीराला डिटॉक्स करतात. या भाज्यांमध्ये कॅलरी खूप कमी असते, तर पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. या पौष्टिक घटकांमुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते. चला तर मग, चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकणार्या अशाच काही भाज्यांविषयी जाणून घेऊया :
शिमला मिरचीचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये करतो. यात कॅप्सैसिन (Capsaicin) नावाचा घटक असतो. कॅप्सैसिन थेट चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला सक्रिय करतो, ज्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात.
पालक ही अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असलेली भाजी आहे. यात लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच, हे शरीराची ऊर्जा आणि चयापचय क्रिया सुधारते. पालकामध्ये थायलाकोईडस् नावाचे घटक असतात, जे भूक वाढवणारे हार्मोन्स दाबून ठेवतात. यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि चरबी कमी होण्यास फायदा होतो.
जेव्हा चरबी कमी करण्याची चर्चा होते, तेव्हा दुधी भोपळ्याचे सेवन खूप चांगले मानले जाते. यात कॅलरीज खूप कमी असतात, तर पाण्याचे प्रमाण तब्बल 96 टक्के असते. यातील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अतिखाण्याची शक्यता कमी होते.
वांगे
वांगे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. यात सॉल्युबल फायबर जास्त असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते. त्याचबरोबर, ते शरीरात चरबी साठण्यासही प्रतिबंध करते. वांग्याचा आहारात समावेश करताना त्यात तेलाचा वापर कमी ठेवावा, जेणेकरून ते डाएट-फ्रेंडली राहील.