रक्तदान हे माणसाच्या जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. रक्तदानमुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. अपघात, शस्त्रक्रिया, कर्करोग, थॅलेसीमिया, गरोदरपणातील अडचणी किंवा गंभीर आजारांमध्ये अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते. मात्र, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही व्यक्तींना रक्तदान करण्याची परवानगी नसते. आरोग्याच्या दृष्टीने हे आवश्यक ठरतं.
या अटींचं पालन केल्यासच सुरक्षित रक्तदान शक्य होतं. प्रत्येकाची इच्छा असली तरी काही वेळा शरीराची किंवा आरोग्याची स्थिती रक्तदानासाठी योग्य नसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खालील काही व्यक्तींनी रक्तदान टाळावं:
भारतात १८ ते ६५ वर्षांदरम्यानचे व्यक्तीच रक्तदान करू शकतात. तसेच, वजन किमान ४५ किलो असणे आवश्यक आहे. जर यापेक्षा कमी वय किंवा वजन असेल, तर अशा व्यक्तीच्या शरीरावर रक्तदानाचा ताण येऊ शकतो.
जर शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल, तर शरीराला आधीच ऑक्सिजनची गरज अधिक असते. पुरुषांमध्ये १३ ग्रॅम/डीएल आणि महिलांमध्ये १२.५ ग्रॅम/डीएल पेक्षा कमी हिमोग्लोबिन असल्यास रक्तदान नाकारलं जातं.
गर्भवती महिलांनी आणि डिलिवरीनंतर काही महिने स्तनपान करणाऱ्या महिलांनी रक्तदान करू नये. कारण, या काळात त्यांच्या शरीराला पोषणद्रव्यांची अधिक गरज असते आणि अशावेळी रक्तदान केल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, फ्लू यांसारखे ताप किंवा संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी रक्तदान करू नये. पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांनी रक्तदान टाळणं आवश्यक असतं.
जर एखाद्या व्यक्तीला HIV/AIDS, हिपॅटिटस B किंवा C, टीबी, सिफलिस अशा आजारांचा संसर्ग झाला असेल, तर त्या व्यक्तींनी आयुष्यभर रक्तदान करू नये. हे विषाणू रक्तातून दुसऱ्याला संक्रमित करू शकतात.
जे लोक मद्यपान करतात, किंवा ड्रग्ज वापरतात, त्यांच्या रक्तात विषारी घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीस दिल्यास धोका निर्माण होऊ शकतो. रक्तदान हे निःस्वार्थ, मानवतावादी कार्य आहे. पण हे करताना जबाबदारीनं व योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली केलं गेलं पाहिजे. काही वेळा आपण मदतीच्या इच्छेने काहीतरी करू इच्छितो, पण आरोग्याची अट लक्षात न घेतल्यास ते इतरांसाठी हानिकारक ठरू शकतं.