Paracetamol Autism Research Pudhari
आरोग्य

Paracetamol Autism Research: पॅरासिटामॉल आणि ऑटिझमचा थेट संबंध आहे का? जगभरातील संशोधन काय सांगतंय

Donald Trump Claims About Tylenol acetaminophen: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉलबाबत केलेल्या दाव्याने जगभरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Paracetamol-Autism Research Facts

पुणे : गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल (Paracetamol) घेतल्याने जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझमचा धोका वाढतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी केला आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच असा दावा केल्यामुळे जगभरात पॅरासिटामॉल या औषधाबद्दल संशय निर्माण झाला. आरोग्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. मात्र आजवरच्या अनेक संशोधनांमध्ये पॅरासिटामॉल आणि ऑटिझम (Autism) यामध्ये थेट कारण-परिणाम संबंध नाही, असे स्पष्ट झाले आहे. तसेच, भारतीय डॉक्टरांनीही स्पष्ट केले आहे की गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल घेतल्याने बाळावर थेट परिणाम होण्याचे प्रमाण अल्प आहे. जाणून घेऊया याविषयी सविस्तर…

पॅरासिटामॉलबाबत ट्रम्प काय म्हणाले ?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) म्हटले होते की, "टायलेनॉल घेऊ नका. (टायलेनॉल हे अमेरिकेतील पॅरासिटामॉलचं ब्रँड नाव आहे.) मला वाटते की आपल्याला ऑटिझमचे उत्तर मिळाले आहे. गर्भधारणेच्या ( Pregnancy) काळात महिलांकडून एसिटामिनोफेन (Acetaminophen) या औषधाचा वापर केल्यामुळे बाळांमध्ये ऑटिझमचा धोका वाढतो. त्यामुळे टायलेनॉल घेण्यापासून शक्य तितके टाळा."

ऑटिझम (स्वमग्न) म्हणजे काय?

ऑटिझम (Autism) ही मेंदूच्या विकासाशी संबंधित अवस्था आहे. याची लक्षणे लहानपणीच दिसतात. व्यक्तीच्या वागणुकीत, बोलण्यात आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत वेगळेपणा असतो. स्वमग्न व्यक्तीची संवादकौशल्ये कमी असतात.ऑटिझम झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणांची तीव्रता वेगळी असते. काही जण उच्च बुद्धिमत्ता असलेले असतात, तर काहींना रोजच्या आयुष्यात मदतीची गरज भासते.अमेरिकेत दर ३६ मुलांपैकी १ मुलाला ऑटिझम असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतात, बहुतांश डॉक्टरांच्या मते हे प्रमाण ५० ते १०० मुलांमध्ये १ आहे.

पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांचा थेट संबंध आहे काय?

जगभरातील शास्त्रज्ञ या दोघांमधील संबंधाचा अभ्यास करत आहेत. भारतीय डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझमचा धोका वाढतो, याची अद्याप ठोस आकडेवारी नाही.जर सामान्य ऑटिझमचा धोका "१" असेल, तर गर्भवतीने पॅरासिटामॉलचे सेवन केल्यास तो १.०५ च्या आतच आहे. महत्त्वाचे म्हणजे फक्त ताप आल्यामुळेही काही वेळा मेंदूवर परिणाम होऊन ऑटिझमसारखे बदल दिसू शकतात.

हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यास काय सांगतो?

पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यामधील संबंधाबाबत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात ४० अभ्यास झाले आहेत. यामध्‍ये पॅरासिटामॉल आणि ऑटिझमचा थेट कारण-परिणाम संबंध नसल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे.

नवीन संशोधन काय सांगते?

नेचर वैद्यकीय जर्नलमध्ये स्वीडनमधील करोलिंस्का इन्स्टिट्यूटचे डॉ. व्हिक्टर अहल्क्विस्ट यांच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे की, गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेतलेल्या महिलांच्या १.४२% मुलांमध्ये ऑटिझम आढळला, तर ज्या महिलांनी गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेतले नव्हते त्यांच्यामध्‍ये हे प्रमाण १.२३% होते. याचा अर्थ गर्भावस्‍थेत पॅरासिटामॉल घेणार्‍या प्रत्‍येक मुलाला ऑटिझम हा विकार होतेच असे नाही. याबाबत युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) ने म्हटले आहे की, "गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉल वापरण्याबाबत आमचा सध्याचा सल्ला कायम आहे. शास्त्रीय पुराव्यांच्या काटेकोर मूल्यांकनावर आमची भूमिका आधारलेली आहे."

अमेरिकेत ऑटिझमच्या रुग्णांमध्ये वाढ, भारतात प्रमाण तुलनेने कमी

अमेरिकेत २००८ मध्ये १.१% मुलांना ऑटिझमचा त्रास होता. २०१८ पर्यंत हे प्रमाण २.३% वर गेले.भारतामध्ये २ ते ९ वर्षांच्या मुलांमध्ये ऑटिझमचं प्रमाण सुमारे १.१२%, म्हणजे ८९ मुलांमागे १ मुलगा आहे.

सर्वच गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक नाही
उन्हाळ्यात आईस्क्रीमची विक्री वाढते. तसेच हिंसक गुन्ह्यांचे प्रमाणही वाढते. याचा अर्थ आईस्क्रीममुळे हिंसक गुन्हे घडतात, असा होत नाही. त्याप्रमाणे गर्भवती महिला हवामान बदलामुळे होणारे साथीचे आजार आणि ताप यासारख्या आरोग्य समस्यांसाठी पॅरासिटामॉल घेतात. मात्र सर्वच महिलांच्या मुलांना ऑटिझम विकार होतो, असे थेट म्हणता येत नाही. मात्र पॅरासिटामॉलमुळे मज्जासंस्थेच्या विकासाशी (neurodevelopmental) संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो, असे अमेरिकेतील माउंट सिनाई येथील साथीच्या आजारांचा अभ्यास करणारे (epidemiologist) संशोधक डॉ. डिडियर प्रादा यांनी म्हटले आहे. तर पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांचा थेट संबंध आहे का? यासंदर्भात मागील वर्षी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी स्वीडनमधील सुमारे २.५ दशलक्ष मुलांच्या इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय नोंदी तपासल्या. यामध्ये असे आढळले की, पॅरासिटामॉल औषधाचा वापर करणार्‍या महिलांमध्ये ऑटिझम, ए.डी.एच.डी. आणि बौद्धिक अक्षमता (intellectual disability) यांचा अल्पसंबंध आढळला. त्यानंतर संशोधकांनी मातेच्या जनुकीय (genetics) किंवा आधीपासून असलेल्या आरोग्य समस्यांचे विश्लेषण केले. यामध्ये आईने दोन गर्भधारणेच्या काळात पॅरासिटामॉल औषधाच्या मात्रेची तुलना केली असता दोन मुलांमध्ये मज्जासंस्थेच्या विकासाशी संबंधित समस्यांमध्ये कोणताही फरक आढळला नाही.

ऑटिझम होण्यासाठी ही कारणे जबाबदार नाहीत

वाईट पालकत्त्व, MMR लस, आहार यांचा ऑटिझमशी काहीही संबंध नाही. तसेच, हा संसर्गजन्य रोगही नाही, असे ब्रिटनमधील आरोग्य सेवेने स्पष्ट केले आहे.

गर्भवतींनी औषध किती प्रमाणात घेतले हे महत्त्‍वाचे
नॉर्वेमधील एका संशोधनात जुळी मुले झालेल्या आईने गरोदरपणात किती काळ पॅरासिटामॉल घेतले यावर संशोधन झाले. यामध्ये असे आढळले की, ज्यांनी गरोदरपणात २८ दिवसांपेक्षा जास्त काळ हे वेदनाशामक घेतले, त्यांच्या बाळांना ए.डी.एच.डी. होण्याचा धोका दुप्पट वाढलेला दिसला. पण ज्या मातांनी गरोदरपणात एक ते सात दिवसांसाठी हे वेदनाशामक घेतले, त्यांच्या बाळांमध्ये अशा समस्यांचा धोका ॲसिटामिनोफेनचा अजिबात संपर्क नसलेल्या भावंडांच्या तुलनेत कमी झालेला दिसला. ताप न उतरल्यामुळे होणाऱ्या परिणामापेक्षा पॅरासिटामॉलचा अल्प-मुदतीसाठी वापर करणे बाळासाठी अधिक चांगले आहे, असे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे वरिष्ठ संशोधक आणि या अभ्यासाचे लेखक इव्हिंड यस्ट्रॉम यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. तसेच गर्भवती महिलांनी कोणतेही वेदनाशामक २८ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त घेऊ नये, असेही ते स्पष्ट करतात.

पॅरासिटामॉल आणि ऑटिझम होणे याचा थेट संबंध अत्‍यंत कमकुवत

एकूणच आकडेवारी पाहता सध्या तरी पॅरासिटामॉल आणि ऑटिझममधील संबंध अत्यंत कमकुवत आहे.त्यामुळे गरज नसताना गोंधळून जाऊ नये. योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT