फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन अर्थात काही औषधांच्या एकत्रिकरणातून तयार झालेली औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पॅरासिटॅमॉलसह इतर घटकांचे मिश्रण असलेल्या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नुसत्या पॅरासिटॅमॉल औषधावर बंदी घालण्यात आलेली नाही.
आता मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे विकता येणार नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाशामक औषधांच्या रूपात वापरण्यात येणार्या एसेक्लोफेनाक 50 एमजी+पॅरासिटामॉल 125 एमजी टॅबलेटवर बंदी घातली आहे. ताप, सर्दी, डोकेदुखी, थकवा, वेदना अशा तक्रारींवर सामान्य लोक सर्रास पॅरासिटॅमॉलसह इतर फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशनची मात्रा वापरतात. त्यामुळे नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने तातडीने औषधांची खरेदी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन मेडिकल स्टोअरमध्ये सर्रास उपलब्ध असतात. त्यामुळे आता औषध विक्रेत्यांना ही औषधे कंपन्यांना परत करावी लागणार आहेत. बंदी घातलेल्या औषधांची विक्री होऊ नये, यासाठी एफडीएकडून पुढील काही दिवसांमध्ये विशेष मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणतीही औषधे डॉक्टरांना न विचारता मेडिकल स्टोअरमधून घेणे योग्य नाही. बंदी घालण्यात आलेल्या औषधांचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात नाही. त्यामुळे शासनाने काही औषधांवर बंदी घातल्यावर आणि त्याची अंमलबजावणी झाल्यावर ती औषधे मेडिकल स्टोअरमध्येही उपलब्ध होणार नाहीत.
- डॉ. राजन संचेती, आयएमए, पुणे
औषधांची काही मिश्रणे कालबाह्य आहेत. काही मिश्रित औषधांमध्ये परस्परविरोधी घटक असतात. मधुमेहाची काही औषधे जेवण्यापूर्वी, तर काही जेवणानंतर घ्यायची असतात. काही औषधांमध्ये दोन्ही प्रकारांमधील घटकांमुळे परिणामकारकता कमी होते, त्यामुळे अशा कॉम्बिनेशन औषधांवर बंदी आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन