Painkillers Antibiotics Kidney Risk CDSCO warning : वेदनानाशके (पेनकिलर) आणि प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) औषधांच्या अनिर्बंध वापराच्या सवयीमुळे 'क्रॉनिक किडनी डिसीज' म्हणजेच दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, किडनी निकामी होण्याचा धोका आणि 'अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स' (AMR) चा धोका खूप वाढतो, असा इशारा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने दिला आहे. जिवाणू किंवा सूक्ष्मजीव अशा औषधांना दाद देईनासे होतात, तेव्हा आरोग्याची ही गंभीर समस्या निर्माण होते, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रण प्राधिकाऱ्यांना या मार्गदर्शक तत्त्वांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) २१ सप्टेंबर रोजी डॉक्टर, फार्मासिस्ट, किरकोळ विक्रेते, वितरक, रुग्णालये आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मार्गदर्शक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये 'नॉन-स्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्स' (NSAIDs) म्हणजेच वेदनानाशके आणि प्रतिजैविकांचा योग्य, सुरक्षित व जबाबदार वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, "डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय किरकोळ विक्री करू नये," असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, औषधांची आयात, निर्मिती, विक्री आणि वितरण हे 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०' आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार नियंत्रित केले जाते. आरोग्यापुढील संभाव्य धोके लक्षात घेता, वेदनाशामक औषधे (NSAIDs) आणि प्रतिजैविकांसह (अँटिबायोटिक्स) अनेक औषधांचा समावेश 'ड्रग्ज रूल्स, १९४५' मधील 'शेड्यूल' G, H, H1 आणि X मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ही औषधे खरेदी करताना किंवा वापरताना डॉक्टरांची योग्य देखरेख असणे अत्यंत आवश्यक आहे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय पेनकिलर किंवा प्रतिजैविकांचा वापर वारंवार किंवा दीर्घकाळ करू नये.
साध्या विषाणूजन्य संसर्गासह (व्हायरल इन्फेक्शन) ज्या आजारांमध्ये प्रतिजैविकांची गरज नसते, तिथे स्वयंउपचार (सेल्फ-मेडिकेशन) टाळावा.
डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैवके सांगितलेल्या नियमांनुसारच घ्यावीत. ती इतर कोणासोबतही शेअर करू नयेत किंवा उरलेली औषधे वापरू नयेत.
किडनीचा आजार किंवा आरोग्याचा अन्य त्रास असेल त्यांनी पेनकिलर घेण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की सांगावे.
दुखणे, ताप किंवा इतर लक्षणे वारंवार उद्भवल्यास, स्वतःच्या मनाने औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉक्टरांनी रुग्णाची शारीरिक स्थिती, वय, इतर आजार आणि जोखीम घटक पाहूनच पेनकिलर आणि प्रतिजैविकांची शिफारस करावी. विशेषतः किडनीच्या आजाराचा धोका असलेल्या रुग्णांसाठी कमीत कमी प्रभावी डोस आणि कमीत कमी कालावधीचा वापर करावा. तसेच, रुग्णालयांनी प्रतिजैविकांचा विवेकपूर्ण वापर आणि प्रिस्क्रिप्शनच्या तपासणीसाठी यंत्रणा अधिक मजबूत करावी, अशी सूचनाही केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने केली आहे.