Shravan fasting Pudhari Photo
आरोग्य

श्रावणातील उपवासाचं आधुनिक नाव 'OMAD': नवा फिटनेस ट्रेंड की शतकांपासूनची परंपरा, तज्ज्ञ काय सांगतात

Shravan fasting: काय आहेत 'एकभुक्ती'चे फायदे, तोटे आणि करण्याची योग्य पद्धत

पुढारी वृत्तसेवा

सध्या फिटनेस आणि आरोग्य क्षेत्रात एकच वेळ जेवणे 'OMAD' (One Meal A Day) या डाएट प्रकाराची मोठी चर्चा आहे. जगभरातील फिटनेसप्रेमी वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी हा ट्रेंड फॉलो करत आहेत. पण गंमत म्हणजे, पाश्चिमात्य देशांसाठी नवीन असलेला हा ‘OMAD’ आपल्यासाठी शतकांपासूनची 'एकभुक्ती' परंपरा आहे. जो आपण विशेषतः श्रावण महिन्यात श्रद्धेने आणि आरोग्यासाठी पाळतो. या उपवासाला श्रावणी असेही म्हटले जाते.

एक फिटनेस चॅलेंज!

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन आपण आरोग्य कसे साधू शकतो, हेच 'एकभुक्ती' किंवा 'OMAD' आपल्याला शिकवते. या श्रावणात एक 'फिटनेस चॅलेंज' म्हणून ३० दिवस 'एकभुक्ती' करून पाहायला काय हरकत आहे? योग्य काळजी घेऊन आणि आपल्या शरीराचे ऐकून जर ही पद्धत अवलंबली, तर शरीर आणि मन दोन्ही हलके झाल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. चला, आपल्या परंपरेला विज्ञानाची जोड देऊन आरोग्याची नवी वाट धरूया. चला तर मग, या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कशी करावी शास्त्रीय पद्धतीने 'एकभुक्ती' (OMAD)?

'एकभुक्ती' म्हणजे दिवसातून फक्त एकदाच पूर्ण जेवण करणे. पण ते कधी आणि कसे करावे, हे महत्त्वाचे आहे.

जेवणाची योग्य वेळ: दुपारची वेळ (साधारणपणे १२ ते २ च्या दरम्यान) एक वेळ जेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. यावेळी आपली पचनशक्ती सर्वात जास्त सक्रिय असते.

संतुलित थाळी: आपल्या एका जेवणात सर्व पोषक तत्वांचा समावेश असावा. चपाती/भाकरी, भात, डाळ, पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीर आणि दही/ताक अशा संतुलित थाळीचा आहारात समावेश करा.

दिवसभर काय प्यावे?: जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त भूक लागल्यास किंवा ऊर्जा कमी वाटल्यास भरपूर पाणी, लिंबूपाणी, हर्बल टी (चहापत्ती आणि साखरेशिवाय) किंवा ताक/बटरमिल्क प्यावे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि थकवा जाणवत नाही.

'एकभुक्ती'चे 'हे' आहेत आरोग्यासाठी फायदे

ही पद्धत केवळ वजन कमी करत नाही, तर शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम करते.

इन्सुलिन नियंत्रण: दिवसातून एकदाच जेवल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते.

सूज कमी होते: शरीरातील अंतर्गत सूज (Inflammation) कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.

वजन आणि ब्लोटिंग कमी: कॅलरी नियंत्रणात राहिल्याने वजन कमी होते आणि पचनसंस्थेला आराम मिळाल्याने पोट फुगणे (Bloating) किंवा गॅसेसचा त्रास कमी होतो.

धोके आणि कोणी सावधगिरी बाळगावी?

कोणतीही गोष्ट प्रत्येकासाठी योग्य नसते. 'एकभुक्ती' सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

सुरुवातीचे परिणाम: सुरुवातीच्या काही दिवसांत थकवा, अशक्तपणा किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. शरीर या बदलाला सरावले की हा त्रास कमी होतो.

कधी थांबावे?: जर तुम्हाला सतत कमजोरी, चक्कर येणे, रक्तातील साखर अचानक कमी होणे (Hypoglycemia) किंवा जास्त अस्वस्थता जाणवत असेल, तर ही पद्धत लगेच थांबवावी.

या व्यक्तींनी 'एकभुक्ती' टाळावी: गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली आणि कोणताही गंभीर आजार (उदा. किडनीचे आजार) असलेल्या व्यक्तींनी ही पद्धत टाळावी.

मधुमेह आणि हृदय रुग्णांसाठी सूचना: मधुमेह (Diabetes) किंवा हृदयविकार (Heart Patients) असलेल्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा प्रयोग अजिबात करू नये.

माझा वैयक्तिक अनुभव

या अनोख्या पद्धती संदर्भात सांगताना डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी म्हणतात, "मी स्वतः गेली ७-८ वर्षे श्रावण महिन्यात नियमितपणे 'एकभुक्ती' करतो. यामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही अत्यंत हलके आणि उत्साही वाटते. पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. ही एक प्रकारची शारीरिक आणि मानसिक शुद्धी प्रक्रिया आहे".

(या उपवास पद्धतीचा अवलंब करताना तुमच्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या...)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT