सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वजन नियंत्रणात ठेवणं आव्हानात्मक बनलं आहे. अनेकदा वजन वाढल्यानंतर ते कमी करणं कठीण जातं आणि त्यासोबतच विविध आजार उद्भवतात. केवळ जिमला जाणं किंवा डाएट करणं पुरेसं नसतं, तर वजन कमी करण्यासाठी काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही उपयुक्त सवयींबद्दल...
वजन कमी करायचं असल्यास सर्वप्रथम साखरेचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. अचानक साखर पूर्णपणे बंद न करता, ती हळूहळू आहारातून कमी करा. गोड खाण्याची इच्छा झाल्यास फळं खा. फळांमधून शरीराला पोषण मिळतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.
शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास मेटाबॉलिझम मंदावतो, ज्यामुळे फॅट बर्न होणं अवघड जातं. आहारात पनीर, मूग डाळ, हरभरा, टोफू यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि चरबीही कमी होते.
वजन कमी करण्यासाठी चालणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. दररोज किमान ४० मिनिटं चालल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि फॅट बर्निंग वेगवान होतं. चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे मानसिक आरोग्यही सुधारतं.
आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावं. पाणी पचनक्रिया सुधारतं, मेटाबॉलिझम वाढवतं आणि भूक नियंत्रणात ठेवतं. याशिवाय, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतं, जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. दररोज ७–८ तासांची शांत झोप घेतल्यास शरीरात 'हॅपी हार्मोन्स' स्रवित होतात, जे तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. झोपेची गुणवत्ता चांगली असल्यास संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.