Multi Vitamin Pudhari
आरोग्य

Multivitamins Tablets: फक्त मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्यांमुळे तुमचे आयुष्य निरोगी होईल का?

बहुतेक मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्या व औषधांमध्ये आवश्यक पोषकतत्त्वांचे प्रमाण कमी असते.

पुढारी वृत्तसेवा

बहुतेक मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्या व औषधांमध्ये आवश्यक पोषकतत्त्वांचे प्रमाण कमी असते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यामधील जीवनसत्त्वांची जैवउपलब्धता कमी असते. आरोग्यपूर्ण जीवनशैली फक्त गोळ्यांवर नाही, तर पचनसंस्थेचे स्वास्थ्य, पुरेशी झोप आणि ताणाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

डॉ. जयदेवी पवार

आज कोणत्याही फार्मसीमध्ये गेलो की समोर चमचमीत बाटल्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यावरच्या जाहिराती मोठमोठ्या आश्वासनांनी भारलेल्या असतात. रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होईल, शरीरात ऊर्जा वाढेल, रोज ताजेतवाने वाटेल आणि आयुष्य अधिक निरोगी बनेल. धावपळीच्या जीवनशैलीत, प्रक्रिया केलेल्या अन्नावर वाढत्या अवलंबित्वामुळे आणि जेवणात पोषणतत्त्वांची कमतरता भासल्यामुळे अनेकांना या रंगीत गोळ्या म्हणजे सर्व समस्यांचे उत्तर वाटू लागले आहे. पण, या गोळ्या खरोखर तितक्या परिणामकारक असतात का? तसेच त्या नियमित घ्याव्यात का? याबाबतची संशोधने काय सांगतात?

अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने जवळपास चार लाख प्रौढांवर केलेल्या दीर्घकालीन अभ्यासात असे आढळले आहे की, मल्टिव्हिटॅमिन्स घेतल्याने आयुष्यमानात कोणतीही वाढ होत नाही. उलट, काही निष्कर्ष असे दर्शवतात की नियमित सेवनामुळे मृत्यूदर किंचित वाढलेला दिसतो. ही बाब चिंताजनक आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवर आजही दोन अब्जांहून अधिक लोकांना सूक्ष्म पोषणतत्त्वांची, विशेषतः लोह, डी जीवनसत्त्व आणि बी 12 जीवनसत्त्व यांची कमतरता जाणवते. असे असले तरी सर्वांसाठी एकसारख्या गोळ्या या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.

खरे म्हणजे, पोषक तत्त्वे नैसर्गिक अन्नामध्ये परस्परांशी सुसंवाद साधून काम करतात. उदाहरणार्थ, लिंबू, संत्रे यांसारख्या फळांतील जीवनसत्त्व सी, डाळींमधील लोह शोषून घेण्यास मदत करते. ही नैसर्गिक प्रक्रिया एका गोळीतून कधीच साध्य होत नाही. म्हणूनच फक्त गोळ्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही. बहुतेक मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्या व औषधांमध्ये आवश्यक पोषकतत्वांचे प्रमाण कमी असते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यामधील जीवनसत्त्वांची जैवउपलब्धता कमी असते. म्हणजेच शरीराला ती योग्य प्रकारे शोषून घेणे अवघड जाते. त्यात बरेचदा संरक्षक द्रव्ये किंवा दर्जाहीन घटक मिसळलेले असू शकतात. सबब आरोग्यपूर्ण जीवनशैली फक्त गोळ्यांवर नाही, तर पचनसंस्थेचे स्वास्थ्य, पुरेशी झोप आणि ताणाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींवर अवलंबून असते.

मल्टिव्हिटॅमिन्स काही प्रमाणात पूरक ठरू शकतात. गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती किंवा विशिष्ट आहार मर्यादा असलेले लोक यांना कधी कधी अतिरिक्त पुरवठ्याची गरज असते. मात्र, या गोळ्या कधीच खर्‍या अन्नपदार्थांची जागा घेऊ शकत नाहीत. कारण नैसर्गिक अन्नात तंतू (फायबर) आणि जैवरासायनिक संरक्षक घटक असतात, जे गोळ्यांमध्ये नसतात. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे चरबीयुक्त जीवनसत्त्वे ए, डी, ई, के यांचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो. वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय अशी पूरक द्रव्ये घेणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

हावर्ड विद्यापीठाच्या विश्लेषणानुसार वृद्ध व्यक्ती, मर्यादित आहार घेणारे लोक किंवा विशिष्ट आजार असणार्‍यांमध्ये काही जीवनसत्त्वांच्या कमतरता आढळतात. मात्र नैसर्गिक अन्नातून मिळणारी पोषणमूल्ये, तंतुमयता आणि जैवसंरक्षक द्रव्ये ही कोणत्याही गोळीपेक्षा अधिक प्रभावी ठरतात. अमेरिकेतील रोगनियंत्रण केंद्राच्या अहवालानुसार तिथे सुमारे 10 टक्के लोकसंख्येमध्ये जीवनसत्त्व डी, लोह किंवा जीवनसत्त्व यांचा अभाव आहेे. विशेषतः कृष्णवर्णीय समुदायात जीवनसत्त्व डी ची कमतरता 31 टक्क्यांपर्यंत आढळते. अशावेळी पूरक द्रव्ये उपयोगी ठरतात, पण एका मर्यादेपर्यंतच!

गर्भधारणेदरम्यान फॉलिक अ‍ॅसिडची गरज असते; वृद्धांना जीवनसत्त्व डी आणि बी 12 आवश्यक असते; तर पचनविकार असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त पूरक मिळणे फायदेशीर ठरू शकते. अन्न शिजवण्याच्या पद्धती, प्रक्रिया केलेले अन्न आणि आधुनिक जीवनशैलीमुळेही काही पोषणमूल्ये कमी होतात, ज्याची पूर्तता काही वेळा गोळ्या करू शकतात, पण त्याला मुख्य पर्याय मानणे चुकीचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT