सतत मोबाईल वापरामुळे तुमचं आयुष्य पोखरत नाही ना? फोन व्यसनाची ७ धोकादायक लक्षणं, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि ओळखण्याचे संकेत जाणून घ्या.
Mobile Addiction Symptoms
मुंबई :आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अनेकांकडून फोनचा अतिवापर होत असून, काही विशिष्ट लक्षणांच्या आधारे तुम्हाला मोबाईलचे व्यसन (Mobile Addiction) जडले आहे का, हे ओळखता येऊ शकते.
सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय पान हलत नाही. कॉल्स, मेसेज, सोशल मीडिया, ऑनलाइन पेमेंट, शॉपिंग आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला आहे. गरज म्हणून सुरू झालेला हा वापर कधी सवयीत आणि पर्यायाने व्यसनात रूपांतरित होतो, हे सहसा लक्षात येत नाही.अनेक जण दिवसभर, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईलला चिकटलेले असतात. जर तुम्हीही सतत फोन सोबत बाळगत असाल, तर खालील ७ लक्षणांवरून तुम्ही मोबाईलच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. जाणून घेवूया ही लक्षणे...
अनेक लोकांना कोणत्याही कारणाशिवाय वारंवार फोन पाहण्याची सवय असते. नोटिफिकेशन आलेले नसतानाही लोक वारंवार फोन अनलॉक करतात. ही कृती मोबाईल व्यसनाचे प्राथमिक लक्षण आहे.
तुम्ही फोन घरी विसरलात किंवा बॅटरी संपली, तर तुम्हाला घाबरल्यासारखे होणे, चिडचिड होणे किंवा प्रचंड अस्वस्थता जाणवत असेल, तर तुम्ही फोनवर प्रमाणाबाहेर अवलंबून आहात हे स्पष्ट होते.
लोकांशी समोरासमोर बोलण्याऐवजी तुम्हाला सोशल मीडिया किंवा चॅटिंगवर बोलणे अधिक सोयीचे वाटत असेल, तर हे मोबाईलच्या वाढत्या प्रभावाचे लक्षण आहे.
वारंवार फोन चेक करण्याच्या सवयीमुळे एकाग्रता भंग पावते. जर तुमच्या अभ्यासावर, ऑफिसच्या कामावर किंवा घरातील कामावर मोबाईलमुळे परिणाम होत असेल, तर तुम्ही व्यसनाच्या मार्गावर आहात.
तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार फोन बाजूला ठेवण्याचा सल्ला देत असतील किंवा मोबाईलमुळे तुमच्या नात्यात तणाव निर्माण होत असेल, तर ही एक धोक्याची घंटा आहे.
अनेकांना वेळेचे भान न ठेवता फोन वापरण्याची सवय लागते. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये, मीटिंगमध्ये, मुलांच्या शिक्षकांशी बोलताना किंवा ट्रॅफिक सिग्नलवर असतानाही जर तुम्ही फोन वापरत असाल, तर हे गंभीर लक्षण आहे.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोप न येणे, डोळ्यांची जळजळ, अंधुक दिसणे, मान आणि मनगट दुखणे, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवतात. या शारीरिक तक्रारी मोबाईल ॲडिक्शनचाच परिणाम आहेत.